Tue, May 21, 2019 00:36होमपेज › Goa › मुलींच्या शिक्षणाबाबत गोवा आदर्श : रामनाथ कोविंद

मुलींच्या शिक्षणाबाबत गोवा आदर्श : रामनाथ कोविंद

Published On: Jul 08 2018 1:43AM | Last Updated: Jul 09 2018 1:01AMपणजी : प्रतिनिधी

देशात मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत गोवा हे इतरांसाठी आदर्श राज्य आहे. गोवा विद्यापीठातील विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक 63 टक्के मुली पदवीधर असून मुलींनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे, असे गौरवोद‍्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर आयोजित गोवा विद्यापीठाच्या तिसाव्या दीक्षांत सोहळ्यात राष्ट्रपती बोलत होते.

गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, कुलगुरू डॉ. वरुण साहनी, कुलसचिव वाय. व्ही. रेड्डी, कोविंद यांच्या पत्नी  सविता कोविंद यावेळी उपस्थित होत्या. सोहळ्यात मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते व्ही. एम. साळगावकर महाविद्यालयाला ‘स्वच्छ महाविद्यालय सन्मान 2017-18’  प्रदान करण्यात आला. 

राष्ट्रपती कोविंद म्हणाले,  सुवर्णपदकप्राप्त 67 पदवीधर  विद्यार्थ्यांमध्ये 41 मुलींचा समावेश  आहे. गोवा विद्यापीठातील  विद्यार्थिनींनी   बजावलेली   ही कामगिरी  देशातील अन्य विद्यापीठांसाठी एक उत्तम उदाहरण आहे. गोवा व गोवा विद्यापीठाबाबत आपल्याला वैयक्तिक स्नेह आहे. शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे कठीण परिश्रम, त्याग व अखंड प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना यश संपादन करणे शक्य झाले.   

शिक्षण म्हणजेच सशक्तीकरण असून आजही देशातील काही राज्यांमध्ये उच्च शिक्षण म्हणजे एखादा सन्मानच आहे. शिक्षणामुळे  जग बदलण्याची क्षमता आपल्यात येते. भारतात युवकांची संख्या अधिक असल्याने त्यांना विविध क्षेत्रे खुली करण्यासाठी शिक्षणाचा दर्जा वाढविण्याचे आव्हान आहे. मुलांनी आपले भवितव्य घडविताना समाजाने आपल्याला जे काही दिले आहे त्याची परतफेड जरूर करावी. विद्यापीठाने अन्य विद्यापीठांशी स्पर्धा न करता स्वत:शी स्पर्धा करावी. विद्यापीठाने उद्योजक निर्माण करण्यावर अधिक  भर द्यावा, असा सल्ला राष्ट्रपतींनी दिला. 

सागरी विज्ञान विभागाकडे अधिक लक्ष द्यावे : राष्ट्रपती

सागरी विज्ञान हा जगभरातील लोकांसाठी मोठा विषय असून या क्षेत्रात अभ्यासास वाव आहे. सागरी जैवविविधतेला सीमा नाहीत. गोवा विद्यापीठात सागरी विज्ञान विभाग असून या विषयात  विद्यापीठाने अधिक लक्ष देऊन  विद्यार्थ्यांना अधिक संधी देणे आवश्यक आहे. विद्यापीठात सुरू असलेल्या पोर्तुगीज आणि लुसोफोन या भाषांच्या अभ्यासक्रमांमुळे पोर्तुगाल व  युरोप खंडाशी द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या संधी निर्माण होणार आहेत. त्यामुळे विद्यापीठाने या दोन विभागांकडे अधिक लक्ष द्यावे.