Mon, Jan 21, 2019 02:44होमपेज › Goa › शिक्षकांनी विद्यार्थ्यांत चिकित्सकवृत्ती रुजवावी  

शिक्षकांनी विद्यार्थ्यांत चिकित्सकवृत्ती रुजवावी  

Published On: Sep 06 2018 1:40AM | Last Updated: Sep 06 2018 1:00AMपणजी : प्रतिनिधी

आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचे  निरीक्षण करण्याची   चिकित्सकवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये  रुजवण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. आज शिक्षिकीपेशा निभावणे आव्हानात्मक झाले असून उत्तम  भावी पिढी घडवण्यात  शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन उत्तर गोवा जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी केले.

शिक्षक दिनानिमित्त राज्य शिक्षण संचालनालयातर्फे  कला अकादमीत आयोजित ‘गोवा राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान सोहळ्यात मोहनन बोलत होत्या.   व्यासपीठावर मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सीताराम नाईक व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात राज्यातील नऊ उत्कृष्ट शिक्षकांना गोवा राज्य शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
धर्मेंद्र शर्मा म्हणाले, चांगला समाज निर्माण होण्यासाठी  विद्यार्थ्यांमधील कौशल्याला दिशा देण्यात शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. गोव्याची शिक्षण व्यवस्था चांगली आहे,त्यामुळे राज्यातील अनेक पिढ्यांचे भविष्य सुरक्षित आहे. 

संभाजी राऊत, सुभाष सावंत, गजानन शेट्ये, श्‍वेता प्रभुदेसाई,  विल्मा परेरा, देविदास कुडव,  गिरीश तेंडुलकर, कोरा दो कोरमो कोइल्हो, रामदास केळकर या शिक्षकांना  राज्य शिक्षक पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

चांगली पिढी घडवण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची 

मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या संदेशातून शिक्षकांना शिक्षक दिनाच्या  शुभेच्छा दिल्या. चांगली पिढी घडविण्यासाठी शिक्षक महत्त्वाची भूमिका पार पाडतात. शिक्षकांनी या पेशाकडे केवळ नोकरी म्हणून न पाहता जबाबदारीने रहावे. आपण चांगला समाज घडविण्यासाठी विद्यार्थी घडविले पाहिजेत. सरकार  या विषयांना सतत पाठिंबा देत आले आहे. पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे आपण अभिनंदन करतो, असा मुख्यमंत्र्यांचा संदेश सीताराम नाईक यांनी  वाचून दाखविला.