होमपेज › Goa › पणजीत ३ मे पासून गोवा राज्य चित्रपट महोत्सव

पणजीत ३ मे पासून गोवा राज्य चित्रपट महोत्सव

Published On: Apr 21 2018 1:14AM | Last Updated: Apr 21 2018 1:02AMपणजी : प्रतिनिधी  

पणजी येथील मॅकेनिझ पॅलेसमध्ये 9 वा गोवा राज्य चित्रपट महोत्सव 3  ते  6 मे दरम्यान होणार आहे. महोत्सवाची सुरुवात कोकणी चित्रपट ‘के सेरा सेरा’ने होणार आहे, अशी माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक  यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तालक म्हणाले, की  या महोत्सवासाठी  10 चित्रपट व दोन नॉन फिचर  चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या आहेत. 10 चित्रपटांमध्ये 9 कोकणी व एकमेव दिशा या मराठी चित्रपटाचा समावेश आहे. महोत्सवाचे उद्घाटन 3 मे रोजी संध्याकाळी  5 वाजता होणार आहे.

तालक म्हणाले, की या महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा 6 मे रोजी होईल. त्यानंतर महोत्सवातील उत्कृष्ट चित्रपटाचे स्क्रिनिंग होईल. 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2017 या काळात तयार झालेले चित्रपट या महोत्सवात दाखवले जाणार आहेत. महोत्सवाचे  बजेट 1.2 कोटी असून  त्यात 35 लाखांची बक्षिसे असणार आहेत. पहिल्या उत्कृष्ट चित्रपटाला 5 लाख, दुसर्‍या उत्कृष्ट चित्रपटाला 3 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल.

उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी  50 हजार  व  35  हजार रुपयांचे तर  उर्वरितांना  25 हजार रुपयांचे प्रत्येकी बक्षीस दिले जाईल. नॉन फिचर फिल्म विभागात उत्कृष्ट नॉन फिचरसाठी व उत्कृष्ट फिक्शनसाठी प्रत्येकी 1 लाखाचे बक्षीस व 25 हजार रुपयांची प्रत्येकी चार बक्षिसे दिली जाणार आहेत. सर्व चित्रपट नागरिकांसाठी मोफत असतील. मागील गोवा राज्य चित्रपट महोत्सवाच्या तुलनेत यंदा महोत्सवासाठी चित्रपटांच्या जादा प्रवेशिका आल्या आहेत. मागील वेळी केवळ आठ प्रवेशिका आल्या होत्या. माहिती व प्रसिध्दी खात्याचे संचालक  टी. ए. सावंत, गोवा मनोरंजन संस्थेच्या मृणाल वाळके, सचिन चाटे  यावेळी उपस्थित होते. 

 

Tags : Goa, Panaji news, Goa State Film Festival,