Sun, Jun 16, 2019 02:10होमपेज › Goa › गोवा राज्य चित्रपट महोत्सव २१ पासून

गोवा राज्य चित्रपट महोत्सव २१ पासून

Published On: Mar 01 2018 1:42AM | Last Updated: Mar 01 2018 12:12AMपणजी : प्रतिनिधी

गोवा मनोरंजन संस्था आणि माहिती व प्रसिध्द खात्याच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 ते 24 एप्रिल दरम्यान 9 व्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

तालक म्हणाले, की कोकणी चित्रपटाचे पिता अल जॅरी ब्रागांझा निर्मित ‘मोगाचो आवंडो ’ प्रथम कोकणी चित्रपट 24 एप्रिल 1950 मध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. एरव्ही तियात्र व दाल्गादो अकादमी मिळून हा दिवस साजरा करण्यात येतो. ते यंदा मनोरंजन संस्था साजरा करण्यात  येणार आहे. गोवा राज्य चित्रपट महोत्सव पुरस्कार 2018 या दिवसा निमित्त प्रदान करण्यात येतील. 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीत तयार झालेले चित्रपट या महोत्सव व पुरस्कारासाठी पात्र असणार आहेत. महोत्सवात सहभागी होणार्‍या चित्रपटांसाठी नाव नोंदणी सुरू आहे. 25 मार्च शेवटची मुदत असणार आहे. 

महोत्सवासाठी फिचर चित्रपट व नॉन फिचर चित्रपट अशा दोन विभागांत  चित्रपट स्वीकारले जातील. फिचर चित्रपट विभागात कोकणी व मराठी चित्रपट भाषेतील चित्रपटांसाठी दोन वेगवेगळे विभाग आहेत.  नॉन फिचर विभागात सर्व भाषांतील चित्रपटांसाठी एक विभाग आहे. फिचर चित्रपट किमान 70 मिनिटांचा असला पाहिजे. नॉन फिचर चित्रपट 5 मिनिट ते 70 मिनिटांच्या आतील असावा. चित्रपटांतील 15 टक्के ऑनस्क्रिन कलाकार व 15 टक्के तंत्रज्ज्ञ गोव्यातील असले पाहिजेत. त्यांच्याकडे गोवा राज्याचा 15 वर्षांचा निवासी दाखला असावा. दोन्ही विभागातील चित्रपटांकडे 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2017 या कालावधीचे सेंन्सर प्रमाणपात्र असले पाहिजे. चित्रपटांना इंग्रजी सबटाईटल्स अनिवार्य आहेत, असेही तालक म्हणाले. 

 मराठी व कोकणी चित्रपटांसाठी फिचर चित्रपट विभागात वेगवेगळे पुरस्कार देण्यात येण्यात येणार आहेत. प्रथम उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार 5 लाख रूपये, व्दितीय उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार 3 लाख रूपये. उत्कृष्ट दिग्दर्शक प्रथम 50 हजार रूपये, द्वितीय उत्कृष्ट दिग्दर्शकासाठी 35 हजार रूपये दिले जाणार आहे.  उत्कृष्ट अभिनेता, उत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट साहायक अभिनेता , उत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री, उत्कृष्ट बाल कलाकार, उत्कृष्ट कथा, उत्कृष्ट पटकथा, उत्कृष्ट गिते, उत्कृष्ट  संगीत दिग्दर्शक, उत्कृष्ट  गायक, उत्कृष्ट  गायिका, उत्कृष्ट  कला दिग्दर्शक, उत्कृष्ट वेशभूषा आदींना प्रत्येकी 25 हजार रूपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

नॉन फिचर चित्रपट विभागात उत्कृष्ट फिक्शन व  नॉन-फिक्शन चित्रपटाला 1 लाख रूपये प्रत्येकी, उत्कृष्ट  संपादन, उत्कृष्ट  संगीत दिग्दर्शन व उत्कृष्ट संकल्पनासाठी 25 हजार रूपये प्रत्येकी पुरस्कार देण्यात येणार आहे. 

पत्रकार परिषदेत संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक मृणाल वाळके, सदस्य संदीप कुंडईकर व माहिती प्रसिध्दी खात्याचे अधिकारी प्रकाश नाईक उपस्थित होते.