पणजी : प्रतिनिधी
गोवा रणजी क्रिकेट संघात राज्यातील क्रिकेटपटूंना डावलून परराज्यातील क्रिकेटपटूंना गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) संधी देत असल्याची टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी पणजी काँग्रेस भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. जीसीए अध्यक्ष सूरज लोटलीकर या सर्व प्रकरणात असल्याचा आरोप नुकताच गोव्याचा क्रिकेटपटू शदाब जकाती यांनीदेखील केल्याचे सांगून लोटलीकर यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणीही पणजीकर यांनी केली.
पणजीकर म्हणाले की, जीसीए अध्यक्ष लोटलीकर हे गोवा फॉरवर्ड पक्षाचे खनिजदारदेखील आहेत. शदाब जकाती, स्वप्निल अस्नोडकर, सौरभ बांदेकर या गोव्याच्या क्रिकेटपटूंनी केवळ गोवा रणजी संघातच नव्हे तर आयपीएल क्रिकेट स्पर्धेतदेखील खेळून गोव्याचे नाव सर्वत्र पोहचवले. मात्र, आता याच खेळाडूंना डावलून परराज्यातील दोन खेळाडूंना गोव्याच्या रणजी संघात स्थान देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अमित वर्मा व हसाद्दीन महम्मद अशी या खेळाडूंची नावे आहेत. या खेळाडूंची उल्लेखनीय अशी कुठलीच कामगिरी नाही. मग त्यांना गोवा रणजी संघात कुठल्या निकषावर तसेच आधारावर घेण्यात आले याचे स्पष्टीकरण आवश्यक आहे. सदर प्रकार म्हणजे एक घोटाळा आहे, असे ते म्हणाले. एनएसयुआयचे अध्यक्ष एहराज मुल्ला, नितीन पाटकर व प्रसाद आमोणकर यावेळी हजर होते.
खेळात राजकारण नको
जकाती हा 2017 च्या विधानसभा निवडणूक काळात गोवा फॉरवर्ड पक्षाचा स्टार प्रचारक होता. मग आता त्याच्यावर हा अन्याय का केला जात आहे. कुठल्याही क्रीडा किंवा अन्य संस्थेत राजकारण आणणे योग्य नसल्याचेही पणजीकर यांनी यावेळी सांगितले.