Sun, Jul 21, 2019 02:00होमपेज › Goa › सरपंचाचे आव्हान; मंत्री, आमदार लागले शेतीकामाला

सरपंचाचे आव्हान; मंत्री, आमदार थेट शेतात

Published On: Jul 05 2018 9:52AM | Last Updated: Jul 05 2018 9:55AMमडगाव : प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून हम फिट तो इंडिया फिट म्हणत फिटनेस चॅलेंज सोशल मीडियावर हिट ठरले. क्रिडामंत्री राज्यवर्धन राठोड यांनी सुरु केलेले चॅलेंज अनेक दिग्गज लोकांपर्यंत पोहचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील ते पूर्ण करत व्यायामाचे, शारिरीक तंदुरुस्तीचे महत्त्व सांगितले होते. याच सोशल मीडिया चॅलेंजपासून प्रेरणा घेत गोव्यात सासष्टीतील युवा राजकारण्यांनी शेतात उतरून काम करण्यासाठी आके-बायशचे सरपंच सिद्धेश भगत यांनी आव्हान दिले. त्यानंतर कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड, महसूल मंत्री रोहन खंवटे आणि कृषीमंत्री विजय सरदेसाई यांनी ते स्वीकारुन प्रत्यक्ष शेतात उतरून एक दिवस शेतीची कामे केली.

मंत्री विजय सरदेसाई यांनी भात लावण केली. मंत्री खंवटे यांनी पर्वरीतील शेतात नांगरणी केली. दोन्ही मंत्र्यांनी शेतात उतरून शेतकर्‍यांबरोबर शेतात लावणी लावून सरपंच भगत यांच्या आव्हानाला उत्तर दिले. आके बायशचे सरपंच सिद्धेश भगत यांनी राजकारण्यांनी शेतात उतरून काम करावे आणि शेतकर्‍यांच्या समस्या समजून घ्याव्यात, असे आवाहन केले होते. त्यांच्या या आव्हानाला उत्तर देत कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो यांनी शेतात उतरून काम केले होते. रेजिनाल्ड यांचा शेतीकडे जास्त ओढा आहे. कुडतरी मतदारसंघात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. शेतीबरोबर मिरची, काकडी, भेंडी अशा भाज्यांची लागवडसुद्धा केली जाते. आमदार रेजिनाल्ड यांच्याजवळ स्वतःचा ट्रॅक्टर, पॉवर टीलर अशी सामुग्री आहे. ते स्थानिक शेतकर्‍यांना देखील या सामुग्रीचा वापर करू देतात.

सिद्धेश भगत यांच्या आव्हानाला आता कोण प्रतिसाद देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असतानाच महसूलमंत्री रोहन खंवटे यांनी थेट शेतात उतरून नांगरणी करून शेतकर्‍यांसोबत एक दिवस घालवला. त्यांनी स्वत: लावणी सुद्धा केली. गोंयकारपणाची खरी सुरूवात शेतातून होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून युवावर्ग शेती व्यवसायाच्या संकल्पनेला पुढे नेत आहेत, याचा आनंद वाटत आहे, असे ते म्हणाले.

सरपंच सिद्धेश भगत यांनी आमदार अलेक्स रेजिनाल्ड यांना आव्हान दिले होते. त्यांनी आपल्याला आव्हान दिले. आपण ते स्वीकारले आहे. केवळ प्रसिद्धी मिळावी म्हणून शेतात काम करू नये तर कृषी संस्कृती जपण्यासाठी शेतात उतरावे, असे मंत्री खंवटे यांनी सांगितले. शेतकर्‍यांचे विषय समजून घेण्याबरोबर, त्यांना सुविधा मिळवून देणे, जिथे नाल्याची गरज आहे तिथे नाले उभारून देणे, जुन्या विहिरींची सफाई करणे, अशा सरकारच्या विविध उपक्रमांमुळे शेतीच्या उत्पन्‍न वाढीस मदत होणार आहे, असे मंत्री खंवटे यांनी सांगितले.

नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी फातोर्ड्यात आयोजित शिव योग फाऊंडेशनच्या कार्यक्रमावेळी शेतीत भात लावण करून आव्हानाला उत्तर दिले. तरुणांना शेतीकडे आकर्षित करण्यास ही संकल्पना महत्त्वाची ठरणार आहे. युवकांनी शेतीकडे वळावे असे, आवाहन सरदेसाई यांनी केले.

लुईझिन फालेरोंनी शेतात उतरावे 
मंत्री रोहन खवंटे यांनी हे आव्हान आता नावेलीचे काँग्रेसचे आमदार लुईझिन फालेरो यांना केले आहे. त्यांनी शेतीविषयीचे विधेयक विधानसभेत मांडण्याची तयारी केली आहे. पावसाळी अधिवेशनात शेत जमिनींची बिगर शेतकर्‍यांना विक्री रोखण्याविषयी विधेयक सादर करणार आहोत. युवा नेत्यांचे विचार जुने नेते अंलात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आमदार लुईझिन फालेरो यांनी शेतात उतरून काम करावे, असे आवाहन खंवटे यांनी केले आहे.