Wed, Jan 23, 2019 15:13होमपेज › Goa › गोवा-मुंबई मार्गावर आराम बस व्यवसाय तोट्यात! 

गोवा-मुंबई मार्गावर आराम बस व्यवसाय तोट्यात! 

Published On: Jan 05 2018 1:06AM | Last Updated: Jan 04 2018 10:56PM

बुकमार्क करा
म्हापसा : प्रतिनिधी

गोवा ते मुंबई आणि मुंबई ते गोवा मार्गावर धावणार्‍या  कायम परवानाधारक आराम बसेसना  हंगामी परवान्यांच्या बसेसमुळे प्रवासी मिळत नाहीत. परिणामी  250 बसेसपैकी केवळ 30 बसेसच नुकसान सोसून या  व्यवसायात सक्रिय आहेत, अशी माहिती बसमालक मंदार पार्सेकर व रवींद्र म्हामल यांनी पत्रकारांना दिली.

ऑल  इंडिया परमिट असलेल्या बसेसच्या कायम परवान्यांसाठी  जादा कर भरावा लागतो. तर हंगामी परवाना धारकांना हाच कर कमी प्रमाणात भरावा लागतो. याचाच लाभ घेऊन अनेक बस मालकांनी हंगामी परवाने घेऊन या मार्गावर  बसेस चालवल्या आहेत. नवीन आराम बसेस नागालँड, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेशात नोंदणी करून गोव्यात  आणून प्रवाशांची ने आण केली जात आहे. गोव्यातील प्रवाशांची बुकींग करणारे एजंटस् या नव्या बसेसना प्राधान्य देतात,त्यामुळे  ऑल इंडिया परमिटच्या बसेस केवळ 15-16 प्रवासी घेऊन प्रवास करतात. यामुळे ऑल इंडिया परमिटधारक  आरामदायी  बसेसचा धंदा तोट्यात चालला आहे,असे त्यांनी सांगितले.

स्लीपर कोच बसेसमध्ये गोव्याचे परमिट घेतल्यास केवळ 30 प्रवासी घेता येतात  तर गोव्याबाहेरून येणार्‍या बसेसमध्ये 36 प्रवाशांची सोय कशी केली जाते, आरटीओ अधिकार्‍यांना हे खटकत कसे नाही, असा प्रश्‍न रवींद्र म्हामल यांनी उपस्थित केला. दुसर्‍या चालकाच्या आरामाची व्यवस्था या बसेस मध्ये नसते. याची तपासणी का केली जात नाही, हंगामी परमिट घेऊन प्रवासी वाहतूक करणार्‍या या बसेसमुळे सरकारला करापोटी कमी  महसूल मिळतो  पण बस व्यावसायिक  अन्  एंजटांची  चंगळ होते,असेही म्हामल म्हणाले.

वाहतूक  खात्याने याकडे कटाक्षाने लक्ष दिल्यास सरकारची आमदनी वाढेल व कायम परमिटधारक बस व्यावसायिकांवरील संक्रांत ही दूर होईल व या व्यवसायास बळकटी मिळेल. सरकारने व वाहतूक खात्याने या संदर्भात त्वरित कारवाई करावी,अशी मागणी त्यांनी केली.