Sun, Aug 18, 2019 15:04होमपेज › Goa › योगाला विश्‍वात मान्यता : राज्यपाल मृदूला सिन्हा

योगाला विश्‍वात मान्यता : राज्यपाल मृदूला सिन्हा

Published On: Jun 21 2018 1:15PM | Last Updated: Jun 21 2018 1:15PMपणजी : प्रतिनिधी

प्राचिन काळापासून भारतात नित्यनेमाने केल्या जात असलेल्या  योगने आता विश्‍वरूप धारण केले आहे. योगामुळे सर्व विश्‍व एका घराप्रमाणे एकत्र आले आहे. भारतात चार वर्षापूर्वी साजरा केला जात असलेला योगदिन आता  जगभरात साजरा केला जात आहे. भारतीय संस्कृती टिकविण्यासाठी आणि मनासह शरीर स्वास्थासाठी नियमित योग करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल मृदूला सिन्हा यांनी केले. 

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने राज्य सरकारतर्फे बांबोळी येथील डॉ. शामाप्रसाद स्टेडियमवर गुरूवारी सकाळी सात वाजता झालेल्या योगदिन कार्यक्रमात राज्यपाल सिन्हा बोलत होत्या. व्यासपीठावर  आरोग्य खात्याचे सचिव जे. अशोक कुमार, गोवा क्रीडा  प्राधिकरणचे संचालक एम. व्ही. प्रभूदेसाई, आरोग्य खात्याचे संचालक डॉ. संजीव दळवी, सचिव एस. व्ही. सिंगआदी  उपस्थित होते.
सिन्हा म्हणाल्या, जीवनात अनेक संकटे आणि समस्यांमुळे आपणाला निराशा येते. त्यावेळी चित्तवृती पुन्हा जागृत करण्याचे काम योग करत आहे. योग आज शालेय विद्यार्थ्यांपासून सरकारी अधिकारी ते गृहिणींपर्यंत पोचला आहे. श्‍वासोश्‍वासावर नियंत्रण आणणे शिकल्यास तणावमुक्त जीवन प्राप्त होते. 

मुख्य सचिव धर्मेद्र शर्मा म्हणाले, योगामुळे आत्मा, तन आणि मन यांचा  मिलाफ होतो. योग हा भारताचा  ‘राजदूत’ बनला असून  योगला आता जगभरात मान्यता मिळाली आहे.  
 योगगुरू डॉ. सुरज काणेकर यांच्या नेतृत्वाखाली स्टेडियमवरील शेकडो शालेय विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व नागरिकांनी योगाभ्यास केला.