Sun, Apr 21, 2019 04:20होमपेज › Goa › गोवा पर्यावरण महोत्सव शुक्रवारपासून 

गोवा पर्यावरण महोत्सव शुक्रवारपासून 

Published On: Aug 29 2018 1:42AM | Last Updated: Aug 28 2018 11:40PMपणजी : प्रतिनिधी

कलाकीर्ती व कला अकादमी च्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.31 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीत 6 व्या गोवा पर्यावरण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात विद्यार्थी तसेच सामान्य जनतेसाठी अनेक स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाला यंदा अभिनेते मकरंद अनासपुरे खास निमंत्रित असतील, अशी महिती महोत्सवाच्या आयोजक प्रेरणा पावसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पावसकर म्हणाल्या,  महोत्सवाचे उदघाटन 31 ऑगस्ट रोजी कला अकादमी येथे सकाळी 10 वाजता राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या हस्ते होईल. यावेळी ‘नाम’  संस्थेचे संस्थापक तथा अभिनेते मकरंद अनासपुरे उपस्थित असतील. यंदा डॉ. नंदकुमार कामत यांनी पर्यावरणावर विशेष  गीत लेखन केले आहे. हे गीत महोत्सवात सादर केले जाणार आहे. उदघाटनानंतर यंदाचा  पर्यावरण पुरस्कार  हेमंत कारापुरकर, ग्रीन हेरीटेज इको क्‍लब ऑफ एसएफएक्स शिवोली व राज्यातील काही  सफाई कामगारांना प्रदान केला जाईल. 

कला अकादमीच्या कला दालनात 31 ऑगस्ट रोजी छायाचित्र स्पर्धेतील ‘वर्ल्ड ऑफ इन्सेक्ट्स’ या विषयावरील छायाचित्रांचे प्रदर्शन भरविले जाईल. तसेच ‘सागरी प्रदूषण’ या विषयावरही प्रदर्शन भरविण्यात येईल. उदघाटन सत्रानंतर मकरंद अनासपुरे यांच्या उपस्थितीत चर्चासत्र होईल. त्यानंतर महोत्सवात  लघुपट स्पर्धेतील चित्रपट प्रदर्शित केले जातील. 

संध्याकाळच्या सत्रात प्रश्‍नमंजुषा स्पर्धा होईल. तसेच एश्‍ले दलानी यांचे ‘इ-वेस्ट मिनेस’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. शेवटच्या सत्रात खाद्यपदार्थ  बनविण्याची स्पर्धा देखील आयोजित करण्यात आली आहे. महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी 1 सप्टेंबर रोजी आल्तिनो येथील जॉगर्स पार्क कडुन    ‘जैवविविधतेच्या सानिध्यात वॉक’ होणार आहे.  त्यानंतर कला अकादमीत विद्यार्थ्यांसाठी टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू बनवण्याची स्पर्धा होईल. दुपारच्या सत्रात दादा वैद्य यांच्यावर आधारित  ‘प्राणाचार्य’  या माहितीपटाचे प्रकाशन होईल. त्यानंतर ‘इको पर्यटन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहेत. महोत्सवात 2  सप्टेंबर रोजी सकाळी 7.30 वाजता सायकल रॅली होईल. पर्यावरणाविषयी समाजात जागृकता व्हावी यासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याचे पावसकर यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत प्रवीण सबनीस, धर्मानंद वेर्णेकर व  आयोजन समितीतील अन्य  सदस्य  उपस्थित  होते.