Sun, May 26, 2019 09:27होमपेज › Goa › गोवा डेअरीतील घोटाळ्याची चौकशी सुरू

गोवा डेअरीतील घोटाळ्याची चौकशी सुरू

Published On: Apr 28 2018 1:42AM | Last Updated: Apr 28 2018 12:02AMफोंडा : प्रतिनिधी

गोवा डेअरीतील  घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी सहकार निबंधकांनी नियुक्‍त केलेल्या सीए श्रीधर उर्फ यतिश वेर्णेकर यांनी शुक्रवारी सकाळी चौकशीला सुरुवात केली. नवसो सावंत, राधिका काळे व अन्य विभागाच्या अधिकार्‍यांची चौकशी करून  काही कागदपत्रे तपासणी साठी ताब्यात घेतली. व्यवस्थापकीय संचालक नवसो सावंत यांच्या कार्यालयात यतिश वेर्णेकर व अन्य अधिकार्‍यांनी केलेल्या चौकशीवेळी राधिका काळे व डॉ. धुरी उपस्थित होते.       

चौकशीनंतर पत्रकारांशी बोलताना यतिश वेर्णेकर यांनी सहकार निबंधकांनी 6 रोजी चौकशी करण्याचा आदेश काढला होता. मात्र सदर आदेशाची प्रत आपल्याला 8 रोजी मिळाली. चौकशी 3 आठवड्यात पूर्ण करण्याची मुदत दिली आहे. त्यानुसार आजपासून चौकशी सुरु केल्याचे सांगितले. गोवा डेअरीच्या खरेदी विक्री संबधी  सखोल चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीला सर्वजण चांगले सहकार्य करीत असल्याचे यतिश वेर्णेकर यांनी सांगितले. 

व्यवस्थापकीय संचालक नवसो सावंत यांनी सांगितले,की प्राथमिक चौकशीला सुरुवात झाली असून चौकशीत अधिकार्‍यांना सर्व ते सहकार्य केले जाणार आहे.   चौकशी अधिकार्‍यांनी काही महत्त्वाची कागदपत्रे मागवून घेतली आहेत. 

गोवा डेअरीच्या चौकशी समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद सावर्डेकर यांनी सांगितले,की सहकार निबंधकांनी चौकशीसाठी नियुक्त केलेल्या यतिश वेर्णेकर यांनी सखोल चौकशी करून सत्य उघड करावे.  दूध उत्पादक गोवा डेअरीतील गैरव्यवहारामागील सत्य उघड होण्याची प्रतीक्षा करीत आहेत.  संचालक विठोबा देसाई यांनी गोवा डेअरीत कोणताच भ्रष्टाचार झाला नसल्याचे सांगून स्वतःचे हसे करून घेतले आहे. माजी अध्यक्ष माधव सहकारी यांनी घोटाळ्याचे  90 टक्के पुरावे गोळा केले असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे विठोबा देसाई यांना स्वप्नात गोवा डेअरीत गैरव्यवहार झाला नसल्याचा साक्षात्कार झाल्याचे दिसून येत आहे, असेही  सावर्डेकर  म्हणाले. 

Tags : Goa, Dairy scam, investigation,