होमपेज › Goa › नार्वेकरसह चौघांची 4 कोटींची मालमत्ता जप्‍त

नार्वेकरसह चौघांची 4 कोटींची मालमत्ता जप्‍त

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

गोवा क्रिकेट असोसिएशन (जीसीए) आर्थिक  गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने जीसीएचे  माजी अध्यक्ष दयानंद नार्वेकर, पदाधिकारी  चेतन देसाई, विनोद ऊर्फ बाळू फडके व अकबर मुल्‍ला यांची 4.13 कोटी रुपयांची मालमत्ता जप्‍त केल्याची माहिती संचालनालयाच्या सूत्रांनी दिली. या कारवाईअंतर्गत नार्वेकर यांची करंजाळे येथील 324 चौरस मीटरमधील अपार्टमेंट, देसाई यांची वास्को येथील 124 चौरस मीटरची तीन दुकाने, फडके यांचा  रेईश मागूश येथील 6 हजार 697 चौरस मीटर भूखंड तसेच मुल्‍ला यांचे शिरोडा येथील 3 हजार चौरस मीटरचे दोन भूखंड, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या फोंडा  शाखेतील 67 हजार 500 रुपयांची ठेव  अंमलबजावणी संचालनालयाने जप्‍त केली आहे.

जीसीएमध्ये 2006-2007 या काळात  सुमारे 3.87 कोटी रुपयांचा हा आर्थिक गैरव्यवहार झाला होता. बीसीसीआयने जीसीएला अनुदान स्वरूपात दिलेले 3.87 कोटी रुपये  पदाधिकारी दयानंद नार्वेकर, चेतन देसाई, विनोद फडके व अकबर मुल्‍ला यांनी लाटल्याचा आरोप आहे. या तिघांकडे जीसीएत  कुठलेही महत्त्वाचे पद नसताना त्यांनी जीसीएचे अध्यक्ष, सचिव व खजिनदार असल्याची बनावट  कागदपत्रे तयार करून पणजी येथील डेव्हलपमेंट क्रेडिट बँक व कुंडई फोंडा येथील शिरोडा अर्बन सहकारी बँकेत  जीसीएच्या नावे बँक खाती उघडली. जेणेकरून  बीसीसीआयकडून आलेले सदर अनुदान या बँक खात्यांमध्ये जमा केलेे. या रकमेचा उल्‍लेख या चौघांनी   जीसीएच्या बैठकीत तसेच जीसीएच्या बॅलन्स शीटमध्ये केला नाही. या रकमेसंदर्भातील व्यवहाराबाबत चौघेही बँक अधिकार्‍यांशी फोनद्वारे संपर्क साधायचे.

याशिवाय नार्वेकर यांनी  जीसीएच्या बँक खात्यामधून 26 लाख रुपये मुंबई येथील मेसर्स हॅको एंटरप्राईज या कंपनीला देण्यासाठी काढले. सदर कंपनी ही ग्राऊंड रोलर्स, क्रिकेट पिच कव्हर आदींचा पुरवठा करते. प्रत्यक्षात मात्र तपासात  या कंपनीला ही रक्‍कम देण्यात आलीच नसल्याचे समोर आले  आहे, असे सूत्रांनी सांगितले. जीसीएचे आजीव सदस्य विलास देसाई यांनी जीसीए आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने 2016 मध्ये  या संदर्भात तक्रार दाखल केली होती.  या  तक्रारीच्या पार्श्‍वभूमीवर  प्राथमिक चौकशीनंतर भादंसंच्या कलम 408, 409, 419, 463, 464, 468, 471, 420 व 120 अंतर्गत एफआयआर नोंद करण्यात आला होता.

या प्रकरणी जून 2016 मध्ये  पोलिसांनी चेतन देसाई, विनोद ऊर्फ बाळू फडके व अकबर मुल्‍ला यांना अटक केली होती. तर दयानंद नार्वेकर यांची कसून चौकशी केली होती. त्याचबरोबर अंमलबजावणी संचालनालयाकडूनही या प्रकरणाचा तपास केला जात आहे.
 

 

 

tags : Panaji,news,Goa, Cricket, Association, financial, scam,


  •