होमपेज › Goa › पर्रीकर यांच्या प्रकृतीत सुधारणा

पर्रीकर यांच्या प्रकृतीत सुधारणा

Published On: Feb 27 2018 12:58AM | Last Updated: Feb 27 2018 12:43AMपणजी : प्रतिनिधी

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर बांबोळीतील गोमेकॉ   इस्पितळात सोमवारी सलग दुसर्‍या दिवशीही उपचार सुरूच   असून    पर्रीकर यांची प्रकृती सुधारत आहे. त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार असून ते लवकरच कामावर रुजू होतील, असे मुख्यमंत्री कार्यालयातील सचिव रूपेश कामत यांनी कळविले आहे. 

पर्रीकर यांना रविवारी रात्री ‘डिहायड्रेशन’चा त्रास झाल्याने व  रक्तदाब कमी झाल्यामुळे गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आल्याने प्रकृती सुधारत असल्याचेही कामत यांनी कळवले आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी रविवारी रात्री   गोमेकॉत   जाऊन  पर्रीकरांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. सोमवारीही त्यांनी गोमेकॉत जाऊन मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांशी चर्चा केली. त्यानंतर ते प्रतिनिधीशी बोलताना  म्हणाले की, पर्रीकर यांची  प्रकृती स्थिर असून ते उपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहेत. आजारी असतानाही ते दोनापावला येथील घरातून फाईली निपटार्‍याचे काम करत होते. पर्रीकर यांनी आजारातून पूर्ण बरे होईपर्यंत विश्रांती घेण्याची गरज आहे, असे आपले वैयक्तिक मत आहे. 

गोमेकॉच्या एका खास प्रभागात पर्रीकर यांना ठेवण्यात आले असून त्यांना कोणालाही भेटण्याची डॉक्टरांनी परवानगी दिलेली नाही. पर्रीकर यांच्या प्रकृतीच्या चौकशीसाठी मंत्रिमंडळातील काही सदस्य तसेच भाजपाचे काही आमदारही सोमवारी गोमेकॉत आले होते. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, सभापती डॉ. प्रमोद सावंत, तसेच देशाचे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल सुशांत नाडकर्णी यांनीही गोमेकॉ इस्पितळाला भेट दिली. भाजपचे अनेक कार्यकर्ते तथा हितचिंतकांनीही सोमवारी गोमेकॉत गर्दी केल्याने सुरक्षारक्षकांची तारांबळ उडाली होती.