Wed, Jul 17, 2019 11:59होमपेज › Goa › अर्थसंकल्प २२ फेब्रुवारीला 

अर्थसंकल्प २२ फेब्रुवारीला 

Published On: Jan 11 2018 1:05AM | Last Updated: Jan 10 2018 11:33PM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

राज्याचे अर्थसंकल्पीय  अधिवेशन 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून ते 21 मार्चपर्यंत चालणार आहे. पहिल्या दिवशी राज्यपाल मृदुला सिन्हा यांचे अभिभाषण झाल्यानंतर 22 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी येथे पर्वरी येथे मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी   बोलताना  सांगितले. 

पर्रीकर म्हणाले, की या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन  19 फेब्रुवारीला बोलवावे, असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर  22 फेब्रुवारी रोजी आपण वेगऴ्या स्टाईलचा अर्थसंकल्प सादर करणार आहे. सर्व सरकारी खात्यांमध्ये अर्थसंकल्पाची तयारी सुरू झाली आहे. प्रत्यक्ष बैठका येत्या 24 जानेवारी पासून सुरू होतील. अधिवेशनात पंधरा दिवस पुरवणी मागण्यांवर चर्चा होणार असून शुक्रवारी क्‍लिष्ट विषय घेतले जाणार नाही.

सर्वसामान्यांना नेहमीच दिलासा देणारे आपले सरकार असून करांद्वारे जो महसूल मिळवला जातो, त्यापैकी 70 ते 80 कोटी रुपये दरमहा विविध योजनांद्वारे पुन्हा लोकांकडे पोहचत आहेत. सर्वसामान्यांसाठी राज्य सरकार अनेक  योजना राबवत आहे. गोव्यातील 80 टक्के कुटुंबे कुठल्या ना कुठल्या शासकीय योजनेच्या लाभार्थी गटात  येतात. महागाईची लोकांना झळ बसू नये म्हणूनच महिलांना ‘गृह आधार’ योजनेखाली दरमहा दीड हजार रुपये मानधन दिले जाते. मात्र टोमॅटोचे दर थोडे जरी वाढले तरी, गोव्यातील वर्तमानपत्रांमध्ये त्याबाबत मोठ्या बातम्या प्रसिद्ध होतात व सरकारचे महागाईकडे लक्ष नाही, अशी टीप्पणी केली जाते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

16 जानेवारीला ‘अस्मिता दिन ’

येत्या 16 जानेवारीला जनमत कौल  दिवस असून गोवा सरकारतर्फे तो ‘अस्मिता दिवस ’ म्हणून साजरा करण्यात येईल. यासंबंधीचा मुख्य कार्यक्रम मडगावला होणार आहे. जनमत कौल म्हणजे काय याविषयी जागृती व्हावी व सवार्ंना त्याचे लाभ कळावेत म्हणून मडगाव येथे होणार्‍या सोहळ्यात सरकार   तेथील विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्याची सूचना  करणार आहे. कार्यक्रमाची रुपरेषा मंत्री विजय सरदेसाई जाहीर करणार आहेत. स्व. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा विधानसभेत उभा करावा, या मागणीबाबत आपण योग्यवेळी बोलू.