Mon, May 20, 2019 18:09होमपेज › Goa › खाणबंदी तोडग्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊ

खाणबंदी तोडग्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाऊ

Published On: Jun 13 2018 1:33AM | Last Updated: Jun 13 2018 1:33AMपणजी : प्रतिनिधी

गोव्यातील  खाणबंदीप्रश्‍नी  पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी चर्चा करण्यात आली आहे, असे केंद्रीय भूपृष्ठ  वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी  पणजी येथे तिसर्‍या केबलस्टेड मांडवी पुलाच्या  शेवटचा स्लॅब बसवण्याच्या कार्यक्रमावेळी  बोलताना सांगितले. मंत्री गडकरी यांनी बटण दाबल्यानंतर यंत्राद्वारे स्लॅब बसवण्यात आला.

मंत्री गडकरी म्हणाले,  राज्यातील खाण प्रश्‍न केंद्र सरकारकडे मांडण्यात आला आहे. सदर प्रश्‍न खाण अवलंबितांचा रोजगार तसेच पर्यावरण अबाधित ठेवून  सोडवण्यात येईल. मांडवी नदीवरील तिसरा पूल हा   देशातील सर्वाधिक लांबीचा तिसरा  केबलस्टेड पूल आहे. या पुलाच्या उभारणीचे काम वेगाने सुरू असून   नदीच्या वरच्या भागाच्या जोडणीचे काम पूर्ण  झाले आहे. सदर पूल हे  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न आहे. या कामासाठी 50 टक्के निधी केंद्र सरकारकडून दिला गेला आहे.  मांडवीवरील या नव्या पुलामुळे पणजीच्या  सौंदर्यात अधिक भर  पडेेल, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील अन्य पुलांबाबत सांगताना गडकरी म्हणाले, झुवारीवरील नवा पूल हा केवळ देशातील नव्हे तर  जगातील  उत्कृष्ट पूल असून त्यात पार्कींग सुविधा, रेस्टॉरंट तसेच देखरेख मनोरे आदी सुविधा असतील. त्यावरून संपूर्ण गोव्याचे दर्शन घेता येईल. झुवारी पुलाचे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी प्रयत्न असल्याचेही त्यांनी  सांगितले. गोवा-मुंबई महामार्गाचे काम  वेगात सुरू असून  येत्या वर्षी मार्चपर्यंत पूर्ण झाल्यानंतर त्याचे उद्घाटन होईल. मात्र या महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्याचे काम पूर्ण होण्यास वेळ लागण्याची  शक्यता असल्याचेही गडकरी म्हणाले.

गोव्यात मोपा हा आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधून होण्यापूर्वी  येथील जलमार्ग विमानतळाशी जोडता येईल का, याचे सर्वेक्षण करण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे.जेणेकरून विमानतळावर प्रवासी उतरल्यानंतर हॉटेलमध्ये जाण्यासाठी रस्ते वाहतुकीऐवजी प्रवासी जहाजाचा पर्याय निवडू  शकतील. अशा प्रकारची सोय  व्हेनिस शहरात  असल्याचेही मंत्री गडकरी यांनी  सांगितले. दक्षिण गोवा खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई, महसूलमंत्री रोहन खंवटे, गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पाऊसकर, उपाध्यक्ष  सिध्दार्थ कुंकळ्येकर, आमदार ग्लेन टिकलो, सार्वजनिक बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता  उत्तम पार्सेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.