Mon, Jul 15, 2019 23:45होमपेज › Goa › ‘मोपा’ साठीच्या जमिनीना योग्य भाव द्या 

‘मोपा’ साठीच्या जमिनीना योग्य भाव द्या 

Published On: Mar 25 2018 12:36AM | Last Updated: Mar 25 2018 12:36AMपेडणे : प्रतिनिधी

मोपा विमानतळ प्रकल्पासाठी ज्या कुळाच्या जमिनी गेल्या  आहेत त्यांना योग्य भाव देऊन सरकारने कुळ मूंडकारांना न्याय द्यावा अशी मागणी गोवा कुळ मूंडकार संघर्ष समिती तर्फे करण्यात आली.   

गोवा कुळ मूंडकार संघर्ष समिती पेडणे आणि बार्देश तालुका यांची पत्रकार परिषद गडेकर भाटले येथे गुरूवारी घेण्यात आली.  व्यासपीठावर संघर्ष समितीचे अध्यक्ष डॅनियल डिसोझा, तेरेखोल कुळ मूंडकार संघर्ष समितीचे अध्यक्ष फ्रान्सिस रॉड्रीगीस, बोडगेश्‍वर कुळ मूंडकार संघर्ष समितीचे अध्यक्ष संजय बर्डे, निमंत्रक दीपेश नाईक, भंडारी समाज अध्यक्ष तथा सभासद उमेश तळवणेकर, माजी अध्यक्ष नारायण मयेकर, सुहासिनी साळगावकर, किशोर गडेकर, नारायण गडेकर, राजन पार्सेकर, सुभाष पार्सेकर आदी उपस्थित होते. 

डॅनियल डिसोझा म्हणाले की, सरकार कुळ मुंडकारावर अन्याय करत असून अनेक खटले मामलेदार कार्यालयात प्रलंबीत आहेत. सरकारच्या विरोधात आवाज उठविण्याचा प्रयत्न केल्यास दाबले जाते.  मोर्चे नेल्यास  मारहाण केली जाते. जे प्रश्‍न चर्चेतून सुटू शकतात ते मारून सुटत नाहीत. त्यामुळे येणार्‍या लोकसभा निवडणुकीत सरकारला जनता योग्य तो धडा शिकवेल.

फ्रान्सिस रॉड्रीगीस म्हणाले, की भाजप सरकारने कुळ मुंडकार कायद्यासंबंधी जो बदल केला तो योग्य नसून त्यातून गरीबांची लूट होऊन मामलेदाराकडे असलेले खटले हायकोर्टात नेण्यासाठी वकिलांना 30 हजार मोजावे लागतात. पूर्वी जिल्हा सत्र न्यायालयात होते ते आता हायकोर्टात न्यावे लागते. त्यामुळे हे सरकार  गरीब जनतेला छळत असून 30 हजार नसेल तर खटला वकील घेत नाहीत, असे  सरकारने का केले.   सरकार जर कायद्यात बदल करत नसेल तर 70 टक्के जनता जे कुळ आणि मूंडकार आहेत ते सरकार विरोधात रस्त्यावर  उतरणार असा इशारा  त्यांनी दिला. 

उमेश तळवणेकर म्हणाले, की  सरकारने कुळ मूंडकार बाबतीत झोपेचे सोंग घेतले आहे. आज सरकारचा कुठल्याच गोष्टीवर अंकुश राहिला नाही. मुख्यमंत्री अमेरिकेला उपचार घेत असून सरकरवर कुणाचा वचक नसल्याने लोकांच्या समस्या तसेच कुळ मूंडकाराचे प्रश्‍न कोण सोडविणार  म्हणून  राज्यपालांनी  सरकार बरखास्त करून निवडणूक जाहीर करावी.
 दीपेश नाईक म्हणाले की सरकारने  2014 साली  नवीन कायदा शेतकर्‍यांसाठी आणला. मात्र त्यावेळी  शेतकर्‍यांच्या जमिनीला योग्य दर देता आला नाही.  सरकाने  मोपा विमानतळ प्रकल्पासाठी खूपच कमी दर देऊन शेतकर्‍यांची फसवणूक केली आहे. मोपा येथील दोन घरे पाडली त्या कुटुंबीयांना सरकारने योग्य तो न्याय द्यावा.   जोपर्यंत सरकार कुळ मूंडकारांना योग्य दर देत नाही तसेच जी दोन घरे पाडली त्यांना न्याय देत नाही तोपर्यंत कुळ मूंडकार संघर्ष समिती सरकारच्या विरोधात आवाज उठविणार. 

संजय बर्डे म्हणाले, की मोपा विमानतळ प्रकल्पासाठी सरकारने सुमारे साडेपाच कोटी रुपये जमिनीसाठी दिले.  तेच पैसे शेतकर्‍यांना योग्य हिशोबाने दिले जावेत.  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  महाराष्ट्रातील  प्रकल्पात  तिथल्या जागेसाठी दोन  हजार रुपये दर देतात. मग गोव्यातील जमिनीला तो दर का नाही.     

नारायण मयेकर म्हणाले, की  आज पेडणे सरकारी कार्यालयात कर्मचारी तसेच मामलेदार नसल्याने  कुळ  मुंडकारांचे खटले तसेच पडून आहेत. आजपर्यंत स्थानिक आमदारांनी  एकदाही मामलेदार कार्यालयाला भेट दिली नाही. त्यामुळे  पेडणेकरांच्या समस्या कोण सोडविणार  असा प्रश्‍न उपस्थित केला.

Tags : goa, Give proper value,  land,  for mopa, goa news