Thu, Jun 20, 2019 06:29होमपेज › Goa › खाण अवलंबितांना आर्थिक पॅकेज द्या

खाण अवलंबितांना आर्थिक पॅकेज द्या

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 21 2018 1:41AMपणजी : प्रतिनिधी

खाणी सुरू होईर्पयत खाण अवलंबितांची  कर्जे फेडण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी, तसेच खाण अवलंबितांना आर्थिक ‘पॅकेज’ द्यावे, अशी मागणी राज्यातील खाण अवलंबितांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

खाणबंदीनंतर उद्भवलेल्या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी गोव्यात आलेल्या केंद्रीय  मंत्री नितीन गडकरी यांनी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मंगळवारी राज्यातील खाण अवलंबित कामगार, कर्मचारी,  बार्ज मालक, ट्रक मालक तसेच मशिनरी मालक ,  खाण व्यावसायिकांशी   खाण प्रश्‍न कशा प्रकारे सोडविता येईल व नव्याने लवकर  खाणी कशा सुरू करता येतील, यावर  गटवार चर्चा केली.त्यावेळी आमच्या डोक्यावर बरीच मोठी कर्जे असून खाणी बंद झाल्याने धंदा डबघाईला आला आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला मदत करावी, अशी मागणी बार्ज मालक, ट्रक व्यावसायिक आणि अन्य घटकांनी केली.

गोवा खनिज निर्यातदार संघटनेतर्फे अध्यक्ष अंबर तिंबले व उद्योगपती शिवानंद साळगावकर यांनी गडकरी यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. तिंबले यांनी पत्रकारांना सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या विविध निवाड्यांचा आणि ‘एमएमडीआर’ कायद्याचा तसेच गोव्यातील खाणींशी निगडित सर्व कायदेशीर बाजूंचा अभ्यास करून मगच केंद्र सरकारने निर्णय घ्यावा व गोव्यातील खाणी लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी आम्ही गडकरी यांच्याकडे केली आहे. संघटनेकडून या आठवड्याच्या अखेरीस सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर केली जाणार आहे.

गोव्यातील शंभरपेक्षा जास्त बार्ज व्यावसायिकांनी एकूण 109 कोटींचे कर्ज घेतलेले आहे. खाणी बंद झाल्याने आमचा धंदा बंद होणार आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला मदत करावी, अशी मागणी करण्यात आल्याचे बार्ज मालक संघटनेचे अध्यक्ष रेमंड डिसा यांनी सांगितले. यावेळी माजी अध्यक्ष अतुल जाधव उपस्थित होते. 

दरम्यान, गडकरी यांनी   सोमवारी भाजप आघाडी सरकारातील घटक पक्ष मगो, गोवा फॉरवर्ड, अपक्ष  तसेच अनेक राजकीय नेत्यांशीही संवाद साधून त्यांची खाणबंदीवरील तोडग्याबाबत मते जाणून घेतली होती. काही पंचायत सदस्य, नगरसेवक तसेच काही स्वयंसेवी संघटनांच्या पदाधिकार्‍यांशीही त्यांनी चर्चा केली. बंदी काळात खाणींवरील कामगारांना व कर्मचार्‍यांना महामंडळ स्थापन करून त्यामार्फत  पगार द्यावा, अशी मागणी ‘आयटक’ आणि ‘सीपीआय’ तर्फे करण्यात आली.कामगार संघटनेचे नेते पुती गावकर यांनीही गडकरी यांची भेट घेतली.