Tue, Apr 23, 2019 00:15होमपेज › Goa › टुरिस्ट टॅक्सींना काळ्या पिवळ्या टॅक्सींचे परवाने द्या 

टुरिस्ट टॅक्सींना काळ्या पिवळ्या टॅक्सींचे परवाने द्या 

Published On: Dec 17 2017 1:42AM | Last Updated: Dec 17 2017 1:16AM

बुकमार्क करा

म्हापसा : प्रतिनिधी

सिरसई येथून प्रवासी वाहतूक करणार्‍या सफेद टुरिस्ट टॅक्सींना वाहतूक खात्याने काळ्या पिवळ्या टॅक्सींचे परवाने द्यावेत. तसेच थिवी रेल्वे स्थानकाजवळ सफेद पर्यटक टॅक्सींना जागा देऊन प्रवासी वाहतूक करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी सिरसई पर्यटक टॅक्सी असोसिएशनचे अध्यक्ष शंकर कांदोळकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस व सिरसई पर्यटक टॅक्सी असोसिएशनने संयुक्तरित्या शनिवारी म्हापशात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शंकर कांदोळकर बोलत होते. सिरसई पर्यटक टॅक्सी असोसिएशन  उत्तर गोवा पर्यटक टॅक्सी असोसिएशनशी संलग्न आहे.

सिरसई रेल्वे स्थानकापासून  तीनशे मीटरच्या बाहेर सुमारे 23 सफेद पर्यटक टॅक्सीवाले प्रवासी वाहतूक करतात. त्यांना रेल्वे स्थानकाजवळ जाऊन प्रवासी वाहतूक करता येत नाही. रेल्वे स्थानकात काळ्या पिवळ्या टॅक्सींना प्रीपेड काऊंटर आहे. तेथे 40 काळ्या पिवळ्या टॅक्सी आहेत. रेल्वेतून उतरणार्‍या प्रवाशांची वाहतूक हे टॅक्सीवाले करतात. या सर्व टॅक्सी प्रवासी घेऊन गेल्यानंतर रेल्वेस्थानकावर राहिलेले व चालत खाली आलेले प्रवासी सफेद टुरिस्ट टॅक्सीवाल्यांना ग्राहक म्हणून मिळतात, अशी माहिती कांदोळकर यांनी दिली.

यापूर्वी आम्ही वाहतूक खाते, जिल्हाधिकारी,  मामलेदार व पोलिसांना निवेदन सादर करून आमच्या मागण्या त्यांच्यासमोर ठेवल्या. परंतु आपल्या मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. याबाबत  दोन महिन्यांत निर्णय घेऊ, असे आश्‍वासन वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिले होते. मात्र अद्याप काहीच निर्णय झाला नाही, असे    कांदोळकर म्हणाले.

सध्या रेल्वे प्रवाशांची संख्या  वाढली आहे. प्रवाशांची ने आण करण्यासाठी काळ्या पिवळ्या टॅक्सी कमी पडतात. गेल्या 10 वर्षात वाहतूक खात्याने नव्या काळ्या पिवळ्या टॅक्सींना परवाने दिलेले नाहीत.  थिवीत उतरणार्‍या रेल्वे प्रवाशांचा सरकारने सर्व्हे करून आम्हाला काळ्या पिवळ्या टॅक्सींचे परवाने द्यावेत, अशी मागणी पर्यटक टॅक्सी चालक संघटनेचे उपाध्यक्ष बबन तुळसकर यांनी केली. 
थिवी रेल्वेस्थानकावर 40 काळ्या पिवळ्या टॅक्सी आहेत. परंतु त्या अपुर्‍या पडतात. तर प्रीपेड काऊंटरवर तिकिट खरेदी करूनही काहींना टॅक्सी मिळत नाही. या प्रवाशांना काळ्या पिवळ्या टॅक्सींची तासनतास वाट पहावी लागते. सरकारने या गोष्टींचा विचार करून सफेद पर्यटक टॅक्सीवाल्यांना काळ्या पिवळ्या टॅक्सींचे परवाने द्यावेत, अशी मागणी  सुदिन नाईक यांनी केली.या पत्रकार परिषदेला संघटनेचे सचिव संदेश वेर्णेकर व टॅक्सी चालक उपस्थित होते.

टॅक्सी चालकांना काँग्रेसचा पाठिंबा

थिवी   रेल्वे स्थानकावरील  सफेद पर्यटक टॅक्सीवाल्यांच्या मागण्या रास्त आहेत. काँग्रेस पक्षाचा या पर्यटक टॅक्सीवाल्यांना पाठिंबा आहे. आपला पक्ष त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेल, वेळ पडल्यास आंदोलन करील, असे  उत्तर गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष विजय भिके यांनी सांगितले.