Mon, Apr 22, 2019 05:56होमपेज › Goa › पर्यायी मुख्यमंत्री द्या, अन्यथा खुर्च्या सोडा : काँग्रेसची मागणी 

पर्यायी मुख्यमंत्री द्या, अन्यथा खुर्च्या सोडा : काँग्रेसची मागणी 

Published On: May 03 2018 1:28AM | Last Updated: May 03 2018 1:13AMम्हापसा : प्रतिनिधी

विद्यमान राजकीय स्थितीचे अवलोकन केले असता गोव्यात मुख्यमंत्री नाही. प्रशासनात ढिलाई आल्याने कायदा, सुव्यवस्था ढासळली आहे. खुले आम ड्रग्ज व्यवहार सुरू आहेत. गोव्यातील सुशिक्षित तरूण  रोजगार उपलब्ध  नसल्याने या बेकायदा धंद्यात  रस घेऊ लागले आहेत.   म्हणूनच सत्ताधार्‍यांनी नवा  मुख्यमंत्री गोवेकरांना द्यावा, अन्यथा राजकारण सोडून द्यावे, अशी  मागणी  उत्तर गोवा जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार आलेक्स रेजिनाल्ड व अन्य काँग्रेस नेत्यांनी केली.

माजी केद्रींय मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप, आमदार निळकंठ हळर्णकर, आमदार टोनी फनार्ंडिस, उत्तर गोवा काँग्रेस जिल्हाध्यक्ष विजय भिके, सुदीन नाईक, महाबळेश्‍वर तोरस्कर , अमरनाथ पणजीकर आदी नेते यावेळी उपस्थित होते.

आमदार  रेजिनाल्ड लॉरेन्स  म्हणाले की, किनारी भागात विशेष करून हणजूणमध्ये शॅक्समध्ये ड्रग्जचा व्यवहार सुरू आहेत. पोलिसांना  याची कल्पना असूनही  कारवाई केली जात नाही. रात्री सुरू असणारे  संगीत रजनी कार्यक्रम पहाटेपयर्ंत चालू असतात. यावेळी ड्रग्ज विक्री व सेवनही  चालू असते. किनारी भागात राजरोस चालणार्‍या पार्ट्यांकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जाते. काँग्रेस  राजवटीत ड्रग्ज व्यवहार  जोरात चालू असल्याचा गजर  करणार्‍यांनी आता काय केले आहे, असा प्रश्‍नही रेजिनाल्ड यांनी उपस्थित केला. 

माजी केंद्रीय मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना राज्याच्या प्रशासनासंदर्भात मार्गदर्शन करायचे असते. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत उपमुख्यमंत्र्यांकडे किंवा ज्येष्ठ मंत्र्याकडे ताबा  द्यायचा असतो.  त्रिमंत्री  समितीची तरतूद   देशाच्या घटनेतही नाही. आजारपणामुळे मुख्यमंत्री लवकर परत येण्याची शक्यता नाही. गोवेकरांना अशा पद्धतीचे सरकार हवे आहे का? गोव्यातील सुशिक्षित तरूण बेकारीमुळे  ड्रग्जच्या  धंद्याकडे वळू लागले आहेत.

खाणी बंद झाल्यामुळे  बेरोजगार लोक रस्त्यावर येऊ लागले आहेत. जुगार, वेश्याव्यवसायात प्रचंड वाढ होत आहे. प्रशासन ठप्प झाले आहे. पर्यायी  मुख्यमंत्री देऊन सरकार चालवणे जमत नसल्यास भाजपने सरकारातून  मुक्‍त व्हावे, अशी मागणीही  खलप यांनी केली.आमदार निळकंठ हळर्णकर म्हणाले की, बार्देशात  म्हापसा हे मुख्य शहर आहे.  भाजपच्या आमदाराने या मतदार संघात काय दिवे लावले? पालिका मंडळ त्यांच्या हातात असूनही जनतेसाठी सुुविधा नाहीत. पार्कींगची व्यवस्था,  रवींद्र भवन नाही. आमदार असताना कोलवाळला रवींद्र भवन उभारण्याचा आपला प्रस्ताव भाजपच्या कार्यकत्यार्ंनी फेटाळून लावला. म्हापशात बिगर गोमंतकीयांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यास भाजपच जबाबदार आहे. पहिला बिगर गोमंतकीय आमदार  म्हापशातून निवडून येईल, असा दावा हळर्णकर यांनी केला.

उत्तर गोवा जिल्हा अध्यक्ष विजय भिके म्हणाले की,  ड्रग्ज व्यवहारात गुंतलेल्यांची नावे जाहीर करण्याचे आश्‍वासन उपसभापती मायकल लोबो यांनी  दिले होते. आता सहा महिने उलटून गेले तरी नावे जाहीर का झाली नाहीत? नुसत्या बढाया मारून काँग्रेस पक्षाला बदनाम करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.