Wed, Sep 26, 2018 20:29होमपेज › Goa › काँग्रेसला सरकार स्थापनेची संधी द्या

काँग्रेसला सरकार स्थापनेची संधी द्या

Published On: May 19 2018 1:31AM | Last Updated: May 18 2018 11:31PMपणजी : प्रतिनिधी

गोव्यात सर्वाधिक जागा जिंकलेल्या काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी न देता कमी जागा जिंकलेल्या भाजपला संधी देण्यात आली. ही चूक काँग्रेसला आता संधी देऊन राज्यपालांनी सुधारावी, अशी मागणी काँग्रेसच्या 16 पैकी 13 आमदारांनी पक्ष पदाधिकार्‍यांसमवेत शुक्रवारी दोनापावला येथे  राजभवनात राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन केली. सरकार स्थापनेचा दावा करून संधी दिल्यास सात दिवसांत बहुमत सिद्ध करू, अशा आशयाचे  निवेदनही त्यांनी राज्यपालांना सादर केले. विद्यमान भाजप  सरकार बडतर्फ करावे, अशी मागणीही प्रदेश काँग्रेसने यावेळी केली. 

राज्यपाल सिन्हा यांनी प्रदेश काँग्रेस पक्षाने सादर केलेल्या निवेदनावर अभ्यास करण्याचे आश्‍वासन दिले. सरकार स्थापनेची संधी दिल्यास सात दिवसांत बहुमत सिद्ध  करू, असे यावेळी राज्यपालांना सांगितल्याची माहिती विरोधी पक्षनेते  बाबू कवळेकर यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांना दिली. विरोधी पक्ष काँग्रेसचे आमदार राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेण्यासाठी येणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर राजभवन परिसरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.  काँग्रेस कार्यकर्तेदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

राज्यपाल सिन्हा यांनी प्रदेश काँग्रेसला दुपारी 12 वाजताची वेळ दिली होती. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, गोवा प्रभारी ए. चेल्‍लाकुमार, माजी प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. शांताराम नाईक  तसेच 16 पैकी 13 आमदारांसह  प्रमुख पदाधिकार्‍यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपली मागणी निवेदनाव्दारे मांडली.विरोधी पक्षनेते कवळेकर म्हणाले, गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र राज्यपालांनी  कमी जागा  जिंकलेल्या  भाजपला सरकार स्थापनेचे आमंत्रण देऊन चूक केली. ज्याप्रमाणे कर्नाटकच्या राज्यपालांनी सर्वाधिक जागा  जिंकलेल्या  भाजपला  सरकार स्थापन्याचे आमंत्रण दिले, त्याच धर्तीवर गोव्यात काँग्रेसला आमंत्रण देऊन आपली चूक सुधारावी, अशी भूमिका राज्यपालांसमोर   मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

गोव्यात भाजप युती सरकार असले तरी अजूनही काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष आहे. परंतु राज्यपालांनी  काँग्रेेसला सरकार स्थापन करण्याची संधी न देता चूक केल्याचे त्यांनी सांगितले.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, बहुमत असूनदेखील काँग्रेसला सरकार स्थापनेसाठी न बोलावून काँग्रेसवर अन्याय झाला आहे. सदर बाब  राज्यपालांच्या नजरेस आणून देण्यात आली असून झालेला अन्याय दूर करावा, अशी विनंती करण्यात आली आहे. 17 आमदार असूनही काँग्रेसला  2017 मध्ये सरकार स्थापन करण्यासाठी बोलावण्यात आले नाही.  भाजपकडील आमदारांची संख्या कमी असल्याने सदर सरकार बडतर्फ करावे, अशी मागणीही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सरकार स्थापनेची संधी दिल्यास सात दिवसांत बहुमत सिद्ध केले जाईल असे पक्षाकडून सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आल्याचेही चोडणकर यांनी म्हटले.