होमपेज › Goa › गिरीष चोडणकर गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

गिरीष चोडणकर गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

Published On: Apr 27 2018 12:52AM | Last Updated: Apr 27 2018 12:48AMपणजी : प्रतिनिधी

काँग्र्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी अखेरीस आपले विश्‍वासू सहकारी आणि अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस गिरीष चोडणकर यांची गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी  निवड जाहीर केली. चोडणकर यांनी निकटचे प्रतिस्पर्धी दिगंबर कामत यांना मागे टाकत या महत्त्वाच्या पदावर बाजी मारल्याचे सूत्रांनी सांगितले. 

अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी गुरूवारी गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी गिरीष चोडणकर यांची नेमणूक करण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले. विद्यमान प्रदेशाध्यक्ष असलेल्या शांताराम नाईक यांनी पक्षाच्या बांधणीसाठी घेतलेले परिश्रम आणि कामाची दखल घेऊन या पत्रकात त्यांचे कौतुक करण्यात आले आहे.   प्रदेशाध्यक्षपदासाठी चोडणकर आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यातच खरी स्पर्धा होती. पक्षातील अनेक आमदारांनी कामत यांना पाठिंबा दिला असला तरी कामत यांचे नाव  संशयित म्हणून अनेक घोटाळ्यांत घेतले जात असल्याने काँग्रेस श्रेष्ठींनी भविष्याच्या द‍ृष्टिकोनातून चोडणकर यांना या महत्त्वाच्या पदासाठी  प्राधान्य दिले आहे. काँगेे्रसच्या बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चोडणकर यांना पाठिंबा दिला असल्याने, तसेच    विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या द‍ृष्टीने चोडणकर यांच्या बाजूने कौल देण्यात आला असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. 

चोडणकर हे एम.कॉम. (बी.एड) असून सध्या कुडचडे येथील उच्च  माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करत आहेत. 1989 साली कोकणी भाषा आंदोलनातून चोडणकर यांनी काँग्रेस पक्षासाठी कार्य करण्यास सुरवात केली. फातोर्डा मतदारसंघातील  कोंबा भागातून बुथ कार्यकर्ता म्हणून चोडणकर यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली. मडगाव नगरपालिकेचे ते 1993 साली नगरसेवक म्हणून निवडून आले. प्रदेश युवा काँग्रेस कार्यकर्ते म्हणून त्यांनी 20 वर्षे काम केले असून  युवा काँग्रेस अध्यक्ष म्हणून आठ वर्षांत अनेक आंदोलने उभारली.  भाजपचे उमेदवार असलेल्या दिगंबर कामत यांच्याविरूद्ध 2002 मध्ये मडगाव मतदारसंघात, तसेच 2017 साली पणजी मतदारसंघासाठी काँग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांनी  लढत दिली होती.  राहुल गांधी यांचे अत्यंत जवळचे मानले जात असलेल्या चोडणकर यांनी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना ‘एनएसयुआय’च्या राष्ट्रीय स्तरावरील बांधणीसाठी भरीव योगदान दिले आहे. 

Tags : goa, congress, girish chodankar