Thu, Jul 18, 2019 21:52होमपेज › Goa › संस्कृतला अभ्यासक्रमात प्रथम भाषेचा दर्जा मिळावा

संस्कृतला अभ्यासक्रमात प्रथम भाषेचा दर्जा मिळावा

Published On: Feb 26 2018 12:42AM | Last Updated: Feb 25 2018 11:55PMडिचोली : प्रतिनिधी

संस्कृत ही संस्कारक्षम भाषा असल्याने संस्कृत हिच प्रत्येकाची संस्कृती झाली पाहिजे.  त्यासाठी बालक आणि पालक यांच्यात या भाषेविषयी उत्साह निर्माण करणे आवश्यक असून अभ्यासक्रमातही संस्कृतला प्रथम भाषेचा दर्जा मिळावा, असे प्रतिपादन सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. 

साखळी येथील रवींद्र भवनात संस्कृत भारतीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जनपद संस्कृत संमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 

यावेळी उत्तर गोवा अध्यक्ष रामचंद्र गर्दे, सुविनय दामले, संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री दिनेश कामत, जगन्नाथ मणेरकर, चिन्मय आमशेकर व्यासपीठावर उपस्थित होते. 

सावंत म्हणाले, संस्कृतचा दैनंदिन व्यवहारात वापर होणे आवश्यक आहे. असे झाल्यास शालेय अभ्यासक्रमात संस्कृतला निश्‍चितच प्रथम भाषेचा दर्जा मिळेल. संस्कृत भाषेला शालेय अभ्यासक्रमात अनिवार्य करण्यासाठी भाजप सरकारने विशेष प्रयत्न केले आहेत. 

प्रत्येक शाळेत संस्कृत भाषा अनिवार्य होणे आवश्यक आहे. असे झाल्यास आपली संस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत होईल. केवळ इंग्रजीचे स्तोम न माजवता संस्कृतलाही दैनंदिन व्यवहारात स्थान दिले पाहिजे, असेही ते म्हणाले. आपल्या मुलांवर संस्कृत भाषा शिकण्याचा दबाव टाकू नका, असे यावेळी दिनेश कामत यांनी सांगितले. 

विख्यात व्याकरणतज्ज्ञ पाणिनीने कित्येक वर्षांपूर्वी ‘अष्टाध्यायी’ या ग्रंथाद्वारे संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. संस्कृतमधूनच उत्तरी भारतीय भाषा जन्मल्या आहेत. पालकांनी मुलांना संस्कृत भाषेची गोडी लावली पाहिजे. तसेच प्रत्येक शाळा व्यवस्थापनाने संस्कृत हा विषय अनिवार्य करावा, असेही ते यावेळी म्हणाले.