होमपेज › Goa › मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा

Published On: Feb 08 2018 1:44AM | Last Updated: Feb 07 2018 11:19PMपणजी : प्रतिनिधी

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे सर्व सोपस्कार पूर्ण होऊनही केंद्रात प्रत्यक्ष निर्णय  घेण्यास विलंब केला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपले राजकीय वजन वापरून केंद्रामध्ये जो अडथळा येत आहे तो दूर करावा व मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून द्यावा, अशी मागणी करणारे निवेदन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या शिष्टमंडळातर्फे मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.

निवेदन सादर करण्यास गेलेल्या शिष्टमंडळात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, उपाध्यक्ष सुधाकर भाले, कोषाध्यक्ष डॉ. विलास देशपांडे आणि गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, उपाध्यक्ष शंभू भाऊ बांदेकर आणि कार्यवाह सुहास बेळेकर, प्रकाश तळवडेकर यांचा समावेश होता. 

महाराष्ट्र सरकार, केंद्रातील संबंधित खाते या सर्वांनी  मराठी अभिजात भाषेसंदर्भातली सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे.  आता फक्‍त त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळणे बाकी आहे, असे  श्रीपाद जोशी यांनी मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिले. यासंदर्भात मुख्यमंत्री पर्रीकर यांनी केंद्र सरकारकडे शब्द टाकून उर्वरित काम पूर्ण करावे आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून द्यावा, अशी मागणी केली. यावर आपण प्रयत्न करतो, असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.