Mon, Jun 24, 2019 21:59होमपेज › Goa › महागाईमुळे सामान्य जनतेचे हाल : फोन्सेका  

महागाईमुळे सामान्य जनतेचे हाल : फोन्सेका  

Published On: Sep 11 2018 1:36AM | Last Updated: Sep 11 2018 12:24AMपणजी : प्रतिनिधी

केंद्रातील भाजप सरकारच्या मागील साडेचार वर्षांच्या कार्यकालात  सर्वसामान्य जनतेचे महागाईमुळे हाल झाले आहेत, अशी टीका ‘आयटक’ गोवाचे सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी पणजी कदंब बसस्थानकावर महागाई विरोधात  करण्यात आलेल्या निदर्शनांवेळी केली. डाव्या पक्षांनी देशभरात दिलेल्या  बंदच्या हाकेला पाठिंबा देण्यासाठी  पणजी येथील कदंब बसस्थानकावर ‘आयटक’तर्फे निदर्शने करण्यात आली. महागाईवर सरकारने तोडगा काढण्याचीही मागणी करण्यात आली.

फोन्सेका म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारने महागाईवर नियंत्रण आणणार,  काळा पैसा विदेशातून परत आणणार, बेरोजगारी हटवणार,  प्रत्येक भारतीयांच्या बँक खात्यात 15 लाख रुपये जमा करणार, अशी नानाविध आश्‍वासने निवडणुकीपूर्वी दिली होती. मात्र, त्या सर्व आश्‍वासनांची पूर्ती करणे सरकारला जमलेले नाही. सर्वसामान्य जनतेला दिलेली आश्‍वासने पाळण्यात सरकारला अपयश आले असताना दुसरीकडे मात्र सरकारकडून उद्योजकांना सवलती दिल्या जात आहेत. जीवनाश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ होत असतानाच  शेतकरी, समाजातील दुर्बल घटक, कामगार वर्ग, गरीब जनतेच्या प्रश्‍नांकडे  सरकारकडून  दुर्लक्ष होत आहे. मागील एका वर्षात पेट्रोल व डिझेल दरवाढ  रोज केली जाते. 

पेट्रोल प्रति लिटर 80.56 रुपये व डिझेल प्रति लिटर 72.61 रुपयांवर पोहचल्याचेही त्यांनी सांगितले.‘आयटक’नेते  राजू मंगेशकर म्हणाले, जगभरात  भारत हा  एकमेव देश आहे जिथे   पेट्रोलचे दर गगनाला भिडले आहेत.  अन्य देशांच्या तुलनेत   भारतातील पेट्रोलचे दर जास्त आहेत.   त्यातच 1 जुलै 2017 पासून लागू करण्यात आलेल्या जीएसटीमुळे  जनता अधिकच  संकटात सापडली आहे. कामगार नेते प्रसन्‍ना उटगी व  बहुसंख्य कामगार यावेळी उपस्थित होते.