Mon, Jun 24, 2019 16:55होमपेज › Goa › टांग्यातून प्रवास करून इंधन दरवाढीचा निषेध

टांग्यातून प्रवास करून इंधन दरवाढीचा निषेध

Published On: May 25 2018 1:09AM | Last Updated: May 25 2018 12:43AMपणजी : प्रतिनिधी

प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी गुरुवारी पणजीत टांग्यातून प्रवास करून इंधन दरवाढीचा निषेध केला. काँग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत टांग्यातून  जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले. पेट्रोल व डिझेल जीएसटीअंतर्गत आणावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

इंधन दरवाढीविरोधात निषेध करण्यासाठी काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व महिला काँग्रेस नेत्या प्रतिमा कुतिन्हो यांनी  घोडागाडीत स्वार होऊन घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा वळवला. यावेळी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड, माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो व काँगे्रसचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदन सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना कवळेकर म्हणाले, वारंवार होणार्‍या अवाजवी इंधन दरवाढीमुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. अर्थसंकल्पात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पेट्रोलचा दर 65 रुपयांहून अधिक होणार नाही, असे आश्‍वासन दिले होते. त्याचप्रमाणे जर का दर वाढले तर मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करून दर नियंत्रणात आणले जातील, असेही त्यांनी सांगितले होतेे. सध्या मुख्यमंत्री गोव्यात उपस्थित नाहीत, अशावेळी सरकार चालविणार्‍या त्रिमंत्री समितीने याविषयी  बैठक घेऊन पेट्रोलचे दर कमी करण्यावर निर्णय घेणे गरजेचे आहे.

कुतिन्हो म्हणाल्या, इंधन तसेच  अत्यावश्यक साहित्याच्या दरवाढीमुळे गृहिणींच्या आर्थिक नियोजनावर परिणाम झालेला आहे. ‘अच्छे दिन’ केवळ भाजप मंत्र्यांसाठी असून सामान्य जनतेच्या त्रासात दिवसेंदिवस भरच पडत आहे. असेच दर वाढत राहिले तर लोकांना घोडागाडी किंवा सायकलवरून प्रवास करावा लागेल, असेही त्यांनी सांगितले. 

रेजिनाल्ड म्हणाले, कर्नाटकातील निवडणुकीत लाभ व्हावा या उद्देशाने भाजपने इंधनाचे दर वाढविले नव्हते. निवडणुका संपल्यावर लगेच दर वाढविण्यात आले. यावरून भाजपनीती कळते, अशी टीकाही त्यांनी केली.

दिगंबर कामत म्हणाले, अनेक राज्यांकडून केंद्र सरकारने पेट्रोलचे दर कमी करावेत, अशी मागणी होत आहे.  यासाठी पेट्रोल, डिझेल या इंधनांचा जीएसटीत समावेश व्हायला हवा. भूतान देशात अत्यंत कमी दरात पेट्रोल उपलब्ध असून आसामचे लोक तेथून पेट्रोल खरेदी करीत असल्याचे कामत यांनी सांगितले.