होमपेज › Goa › सोपो कंत्राटावरून मडगाव पालिकेत गदारोळ

सोपो कंत्राटावरून मडगाव पालिकेत गदारोळ

Published On: May 19 2018 1:31AM | Last Updated: May 18 2018 11:19PMमडगाव : प्रतिनिधी

सोपो कंत्राट लिलावाची निविदा खुल्या पद्धतीने काढण्यावरून उद्भवलेल्या वादात भाजप  नगरसेवक केतन कुरतरकर यांनी विरोधी गटातील नगरसेवकांवर तुम्ही सोपोच्या व्यवहारात सेटिंग करताहात, असा थेट  आरोप केल्याने मडगाव  पालिकेने बोलावलेल्या खास बैठकीत  गदारोळ माजला. सेटिंग हा शब्द उच्चरल्याबद्दल नगसेवकांची माफी मागावी, अशी सूचना नगराध्यक्षा बबिता आंगले यांनी केली असता निविदा  नियमानुसार योग्य पध्दतीने व्हायलाच हवी, असे स्पष्ट करून कुरतरकर यांनी माफी मागण्यास नकार दिल्याने बैठक वादग्रस्त ठरली.

विविध विषयांवर चर्चेसाठी मडगाव पालिकेने शुक्रवारी नगरसेवकांची खास बैठक बोलावली होती. मडगावात 20 मे रोजी होणार्‍या पुरुमेंताच्या फेस्ताच्या पाश्‍वर्र्भूमीवर नवीन सोपो कंत्राटदाराची नेमणूक करण्याचा विषय चर्चेला होता.त्यामुळे सोपोच्या कंत्राटावरून बैठकीत वाद निर्माण होण्याची शक्यता होती.नगराध्यक्षा बबिता प्रभुदेसाई यांनी सोपो कंत्राटाचा मुद्दा उपास्थित करून साध्या पद्धतीने निविदा स्वीकारण्याचा ठराव मांडला.भाजप नगरसेवक केतन कुरतरकर यांनी त्यास तीव्र आक्षेप घेऊन नियमाप्रमाणे ई- निविदा पद्धतीने निविदा का स्वीकारल्या जाणार नाहीत, असा प्रश्न   केला.सोपो च्या कंत्राटात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.त्यामुळे हा लिलाव ई-निविदा  पद्धतीने होणे गरजेचे आहे,असे मत त्यांनी  मांडले.

नगराध्यक्षा आंगले यांनी त्यास नकार देऊन  इ निविदा पद्धत अवलंबणे सक्तीचे नसून पालिका संचालनालयाने तशी अधिसूचना मडगाव पालिकेला दिलेली नाही, असे सांगितले. नगरसेवक आर्थूर डिसिल्वा यांनी त्यास आक्षेप घेऊन पालिका  स्वायत्त मंडळ असून पालिकेने आपले उत्पन्न कसे कमवावे हा पालिकेचा विषय आहे,असे स्पष्ट केले.नगराध्यक्षा आंगले आपल्या मतावर ठाम राहिल्याने संतापलेल्या केतन कुरतरकर यांनी एरव्ही एका टक्क्यासाठी पालिका डोकीवर घेतली जाते पण इथे कोट्यवधी रुपयांचा विषय असूनही विरोधी गट मूग गिळून गप्प असल्याने यात ‘सेटिंग’ झाल्याचा आरोप केला.

सेटिंग या शब्दावरून काँग्रेस समर्थक नगरसेविका डोरिस टेक्सेरा आणि कुरतरकर यांच्यात बरीच वादावादी झाली.आपण कोणतेही सेटिंग केले नाही, असे सांगून डोरिस यांनी सभात्याग केला. शेवटी बबिता आंगले यांनी मध्यस्थी करून केतन यांना त्यांनी उच्चारलेल्या ‘सेटिंग’ या शब्दासाठी माफी मागावी, अशी सूचना केली.पण त्यांनी त्यास साफ नकार दिला.सोपो कंत्राटदाराला किमान सोपो गोळा करण्याचा अनुभव असावा, अशी अट घालण्याचा प्रस्ताव नगराध्यक्षानी मांडला. त्याला  भाजप समर्थक नगरसेवकांनी आक्षेप घेतला. कंत्राटदाराकडून पालिका इएमडी आणि बँक हमी घेत आहे,त्यामुळे अनुभवाची काही गरज नाही,असे आर्थूर डिसिल्वा म्हणाले. बबिता आंगले म्हणाल्या, गेल्या पाच वर्षात अनुभव नसलेल्या दोन कंत्राटदारांनी फेस्ताच्या फेरीनंतर कंत्राट सोडले.   हात वर करून आपले मत देण्याचे आवाहन आंगले यांनी नगरसेवकांना केले असता नऊ दहा जणांनी हात वर करून ठरावाला समर्थन दिले.त्यामुळे दोन वर्षांच्या अनुभवी कंत्राटदाराला कंत्राट देण्याचे निश्‍चित झाले. यास भाजप नगरसेवक रुपेश महात्मे यांनीही  समर्थन दिले.

 सोनसड्यावर काम करणार्‍या ग्रीन फोमेंतो कंपनीला दुसरा हफ्ता फेडण्यासाठी पालिका मंडळाने मंजुरी दिली असून त्यानुसार त्यांना 2.4 कोटी फेडले जाणार असल्याचे नगराध्यक्षा आंगले यांनी सांगितले. केतन यांनी त्यास आक्षेप घेतांना सोनसड्याच्या कचर्‍यावर अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या असनानी या सल्लागाराच्या अहवालाची मागणी केली.हे पैसे फोमेन्तोने उभारलेल्या साधन सुविधांसाठी आहेत,तसेच असनानी यांचा अहवाल तुम्ही पालिकेतून मिळवू शकता असे प्रत्युत्तर आंगले यांनी दिले. नगराध्यक्षा आंगले यांनी साल 2019-20 आर्थिक वर्षापासून दुकानांचे शुल्क दहा टक्क्यांनी वाढविण्यात येणार असल्याचे जाहीर केले.कामगाराच्या भविष्य निर्वाह योजने बद्दल यावेळी चर्चा झाली.कंत्राटदारांचे पैसे फेडण्यात येणार असल्याचे आंगले यांनी सांगितले.एका महिन्यात पालिका क्षेत्रातील बेकायदेशीर घरांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू केले जाईल, असे या वेळी सांगण्यात आले.