Mon, Jun 24, 2019 21:51होमपेज › Goa › कदंब, खासगी बसमालक  समन्वय समितीची शुक्रवारी बैठक

कदंब, खासगी बसमालक  समन्वय समितीची शुक्रवारी बैठक

Published On: May 01 2018 1:15AM | Last Updated: Apr 30 2018 10:27PMपणजी : प्रतिनिधी

सरकारकडून कदंब वाहक व खासगी बस चालक, मालकांच्या   समस्या व त्यांच्यातील वाद सोडविण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची 4 मे रोजी सकाळी 10.30 वाजता वाहतूक खात्याच्या  कार्यालयात पहिली बैठक होणार असून अनेक महत्वाचे मुद्दे व मागण्यांवर बैठकीत चर्चा होईल, अशी माहिती खासगी बस मालक संघटनेचे अध्यक्ष सुदीप ताम्हणकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

ताम्हणकर म्हणाले, वाहतूक खात्याकडे संघटनेतर्फे आजवर अनेक समस्या  मांडण्यात आल्या आहेत.  कित्येक वर्षे हे विषय प्रलंबितही होते. कदंब व खासगी बस चालकांमध्ये काही ना काही विषयांवरून जे खटके उडतात, ते वाद सोडविण्यासाठी एक समन्वय समिती असावी अशी मागणीही करण्यात आली होती. त्यानुसार वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी    16 मार्च 2018 रोजी  समिती स्थापन केली आहे. 

संघटनेतर्फे यापूर्वी 26 मार्च रोजीच्या बैठकीत चर्चेला यायला हव्यात अशा  मुद्दयांची यादी महामंडळाकडे दिली आहे. या यादीत कोणत्या ठिकाणांवर कदंबच्या फेर्‍या बेकायदेशीररित्या सुरू आहेत, याची माहिती देण्यात आली आहे. बसस्थानकांमध्ये आवश्यक सुधारणा व अन्य काही विषयांचाही त्यात समावेश असल्याचे ताम्हणकर यांनी सांगितले.निखिल देसाई यांनी संघटनेचे अनेक विषय हाती घेतले आहेत, असे सांगून ताम्हणकर यांनी त्यांचे अभिनंदनही केले. ते म्हणाले, यापूर्वीच्या वाहतूक संचालकांनी 15 वर्षांच्या बसेस भंगारात काढाव्यात, असा घातक निर्णय घेतला होता. यावर राज्य वाहतूक विभागाकडे पाठपुरावा करून  निर्णय रद्द करण्यात आला आहे,त्यामुळे बसगाड्यांवर सध्या 15 किंवा 20 वर्षेच बसेस चालवावीत, अशी काही बंधने नाहीत.   जोपर्यंत वाहतूक अधिकारी  कलम 59 अंतर्गत फिटनेस प्रमाणपत्र देतील, तोपर्यंत बसेस चालवायला परवानगी असणार आहे. यामुळे बसवाल्यांना दिलासा मिळाला आहे. 

सरकारकडे निधी नसल्याने बसवाल्यांसाठीच्या योजनांचा लाभ  मिळत नाही.   त्यामुळे सरकारने  अर्थसंकल्पात  तरतूद करून बसमालकांना योजनेचा निधी उपलब्ध करावा, अशी मागणीही ताम्हणकर यांनी केली. बसवाल्यांची इंधनावरील अनुदान योजना नोव्हेंबर 2017 मध्ये संपली होती. ही योजना सरकारकडे पाठपुरावा करून पुन्हा सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर विमा योजना जी 31 मार्च 2017 रोजी संपली होती, ती देखील 31 मार्च 2020 पर्यंत पुढील तीन वर्षांसाठी नूतनीकृत करण्यात आली आहे,असे त्यांनी सांगितले.  पत्रकार परिषदेत रुपेश बांदोडकर, अजेंद्र सावंत, केवल मयेकर, राजेश मजेरीया व नरेश परुळेकर उपस्थित होते. 

लीज नूतनीकरणप्रश्‍नी चौकशी व्हावी : ताम्हणकर

राज्यातील   खाण लीजचे बेकायदेशीरपणे नूतनीकरण करणार्‍यांची चौकशी करण्याचा आदेश  न्यायालयाने सीबीआयला दिला असून चौकशी   अहवाल तीन महिन्यांत सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची योग्य चौकशी झाली नाही तर पुन्हा न्यायालयात जाऊ, असा इशारा ताम्हणकर यांनी दिला. राज्यात एका दिवसात 30-32 लीजच्या नूतनीकरणाचे प्रकार घडले आहेत. सरकारने  घाईघाईत  लीज नूतनीकरण केल्याचा फटका गोमंतकीयांना बसला आहे. खाण कंपन्या गोमंतकीयांना धडाधड  कामावरून कमी करत असून याला राज्य सरकार जबाबदार आहे. या प्रकरणी चौकशी लवकर पूर्ण करून संबंधितांवर  कारवाई  करावी, अशा मागणीचे निवेदन सीबीआयला दिले जाणार आहे, असे ताम्हणकर यांनी सांगितलेे.

...तर बसवाल्यांनी काय करावे 

राज्यात जलमार्गांव्दारे वाहतुकीचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा राज्यातील खासगी बस वाहतुकीवर काही परिणाम होणार आहे का? किंवा प्रवासी वाहतूक जलमार्गे सुरू करण्याचा काही विचार आहे का, यावर सरकारने स्पष्टीकरण देण्याची गरज आहे. जलमार्गांला विरोध करून खासगी बस चालक संघटनेतर्फे  मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर व पोर्ट मंत्री जयेश साळगावकर यांना निवेदन देण्यात आले होते. जलमार्ग वाहतुकीचा बस वाहतुकीला त्रास होण्याची शक्यता  आहे. त्यामुळे सरकारने आंदोलन करायला भाग पाडू नये. प्रवासी वाहतूक सुरू करणार की नाही, यावर स्पष्टीकरण द्यावे. वाहतूक पर्याय असे वाढू लागले तर बसवाल्यांनी काय करावे?

- सुदीप ताम्हणकर, खासगी बस मालक संघटनेचे अध्यक्ष

Tags : Goa,  Friday, Kadamb, meeting, Private, Bus, Coordination, Committee