Wed, Sep 19, 2018 15:24होमपेज › Goa › मधुमेहींना मोफत इन्सुलिन

मधुमेहींना मोफत इन्सुलिन

Published On: Feb 05 2018 1:41AM | Last Updated: Feb 05 2018 12:22AMवाळपई : प्रतिनिधी

गोवा राज्य आरोग्याच्या बाबतीत अधिक परिणामकारक करताना नागरिकांत उत्तमोत्तम सेवा कशाप्रकारे प्रदान करता येतील, याबाबत आपण गंभीर आहोत. आरोग्यविषयक  योजनांसाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचा पाठिंबा मिळाला आहे व येणार्‍या काळात राज्यात मधुमेहींसाठी मोफत इन्सुलिन उपलब्ध  करू, असे सांगून  दीनदयाळ आरोग्य विमा योजनेच्या नूतनीकरणासाठीचे  नोंदणी शुल्क माफ करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केले.

वाळपईत प्रायोगिक तत्त्वावर राबवलेल्या ‘आरोग्य आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत गोवा आरोग्य खाते, गोवा मेडिकल कॉलेज व गोवा डेंटल कॉलेज यांच्या संयुक्‍त विद्यमाने वाळपईच्या सामाजिक रुग्णालयात आयोजित आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

आरोग्यमंत्री म्हणाले, सरकार येणार्‍या काळात मधुमेही रुग्णांसाठी मोफत इन्सुलिन उपलब्ध करणार  असून याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू आहे. तसेच राज्यात नवीन गॅस्ट्रोलॉजी व अ‍ॅनालॉजी विभाग सुरू करण्यात येणार आहे, अशी घोषणाही त्यांनी यावेळी बोलताना केली.

मंत्री राणे म्हणाले की, ‘आरोग्य जनतेच्या दारात’ ही सकंल्पना राबविणारा हा प्रायोगिक तत्त्वावर प्रयत्न आहे. अशा प्रकारच्या अनेक शिबिरांचे आयोजन सत्तरीतील सर्व पंचायतीच्या क्षेत्रात  होणार असून मे महिन्यापर्यंत ते चालणार आहे.