Mon, Jun 24, 2019 16:38होमपेज › Goa › गोमांस पुरवठादारांची सतावणूक करणारे सरकार पुरस्कृत : सार्दिन

गोमांस पुरवठादारांची सतावणूक करणारे सरकार पुरस्कृत : सार्दिन

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 12:26AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

परराज्यातून  गोव्यात कायदेशीरपणे आणले जाणारे गोमांस बेकायदेशीर असल्याचा आरोप करुन  गोमांस पुरवठादारांची सतावणूक करणारे  प्राणीमित्र एनजीओ हे सरकार पुरस्कृत  असल्याचा आरोप  माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते  फ्रान्सिस सार्दिन यांनी पणजीत पत्रकार परिषदेत केला.  सरकारने  याप्रश्‍नी त्वरित तोडगा काढून  बाजारात  गोमांस उपलब्ध करावे.  गोमांस हे गरिबांच्या ताटातील मुख्य अन्‍न आहे. सरकारने तोडगा न काढल्यास पुढील कृती ठरवली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

सार्दिन म्हणाले, की गोमांस हे गोव्यातील  अल्पसंख्यकांबरोबरच अनेकांच्या जेवणातील मुख्य घटक आहे. याशिवाय गोव्याला भेट देणार्‍या पर्यटकांतील  50 टक्के पर्यटक  हे गोमांस खातात. परराज्यातून  गोव्यात कायदेशीरपणे  आणले जाणारे गोमांस  बेकायदेशीर असल्याचा आरोप करुन  गोमांस पुरवठादारांची एनजीओंकडून  सतावणूक  गोमांसाचा तुटवडा निर्माण करण्यासाठी केली जात आहे. संबंधित एनजीओ हे सरकार पुरस्कृत असून  सरकारकडून हे सर्व केवळ आपल्या आरएसएस नेत्यांना खूश करण्यासाठी केले जात आहे. 

परराज्यातून आणले जाणारे गोमांस जर बेकायदेशीर असेल तर त्यासाठी पोलिस आहेत. एनजीओंकडून ही कारवाई का केली जाते?  मागील काही वर्षापासून बंद असलेला गोवा मांस प्रकल्प सरकार सुरु का करीत नाही. सरकारने हा प्रकल्प अगोदर सुरु करावा.  प्रकल्प सुरु न करता गुरांच्या बेकायदेशीर कत्तलीला सरकार एकप्रकार प्रोत्साहनच देत आहे, अशी टीका त्यांनी केली.  काही एनजीओ खरेच बरे काम करतात. मात्र बहुतेक एनजीओ हे पैशांसाठी  काम करतात, असा आरोपही त्यांनी केला.

गोव्यात निर्माण झालेल्या गोमांसप्रश्‍नी  पशुसंवर्धन मंत्री माविन गुदिन्हो यांची आपण भेट घेणार आहे. सरकारने   राज्यातील बाजारपेठेत  गोमांस उपलब्ध करावे व  निर्माण झालेला तुटवडा दूर करावा,असेही त्यांनी सांगितले. 
यावेळी काँग्रेस नेते आल्तीनो गोम्स व अन्य उपस्थित होते.