Sun, Mar 24, 2019 06:56होमपेज › Goa › इफ्फी : ‘वन ट्वेंटी बिटस् ...’ला सुवर्ण मयूर

इफ्फी : ‘वन ट्वेंटी बिटस् ...’ला सुवर्ण मयूर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पणजी ः प्रतिनिधी

फ्रेंच चित्रपट निर्माते ह्यूबस चार्बेन्यू यांच्या ‘वन ट्वेंटी बिटस् पर मिनीट’ या रॉबिन कांपिलो दिग्दर्शित  चित्रपटाला 48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (इफ्फी)  प्रतिष्ठेचा सुवर्ण मयूर पुरस्कार  लाभला. आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक यंदा ‘क्षितिज-अ होरायझन’ या मराठी चित्रपटाला प्राप्त झाले.

48 व्या इफ्फीचा शानदार समारोप सोहळा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर मंगळवारी पार पडला. या सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले. दिग्दर्शन आणि निर्मितीसाठी 40 लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असे स्वरूप असलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्ण मयूर पुरस्कार ‘वन ट्वेंटी बिटस् पर मिनिट’ ला  इफ्फी सुकाणू समितीचे निमंत्रक तथा दिग्दर्शक जानू बरूआ, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते प्रदान  करण्यात आला.

 राज्यपाल मृदुला सिन्हा, अभिनेता सुशांतसिंग राजपूत, इफ्फी सेक्रेटरी जनरल लॉला पोगी गौ जॉन  यांच्या हस्ते आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक ‘क्षितिज-अ होरायझन’चे दिग्दर्शक मनोज कदम यांना प्रदान करण्यात आले.

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर 2017’ या पुरस्काराने यावेळी  केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणी, खिलाडी अभिनेता अक्षय कुमार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. रुपये दहा लाख आणि रजत मयूर व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

कॅनडीयन निर्माते दिग्दर्शक एटम इगोयन यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. रजत मयूर, 10 लाख रुपये  असे या पुरस्काराचे  स्वरूप असून तो मंत्री स्मृती इराणी तसेच अभिनेत्री कॅटरिना कैफ यांच्या हस्ते देण्यात आला. ‘वन ट्वेंटी बिटस् पर मिनीट’ याच चित्रपटात नायकाची भूमिका साकारणार्‍या नावेल परेज या  अभिनेत्याला सर्वोत्कृष्ट कलाकारासाठीचा रजत मयूर आणि दहा लाख रुपयांच्या पारितोषिकाने गौरवण्यात आले. हा पुरस्कार केंद्रीय मंत्री किरण रिजीजू, दिग्दर्शक नागेश कुककूर यांच्या हस्ते देण्यात आला. 

कार्यक्रमास  अभिनेता सलमान खान, करण जोहर, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, हुमा कुरेशी, सचिन खेडेकर, वर्षा उसगावकर, मास्टर मार्टिन रे, अभिनेत्री पूजा हेगडे, ज्युरी अध्यक्ष मुजफ्फर अली, इतर ज्युरी सदस्य आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.