Fri, Jul 19, 2019 22:00होमपेज › Goa › विदेशी, परप्रांतीयांची गुन्हेगारी गोव्याच्या मुळावर!

विदेशी, परप्रांतीयांची गुन्हेगारी गोव्याच्या मुळावर!

Published On: Aug 27 2018 1:13AM | Last Updated: Aug 27 2018 12:38AMकोल्हापूर : अजित डफळे

मनमिळावू, शांत स्वभावाचे आणि सुशेगाद वृत्तीचे म्हणून समस्त  गोवेकर सर्वपरिचित आहेत. काही वर्षांपूर्वी राज्यात गुन्हे घडण्याचे प्रमाण तसे नगण्यच होते. मात्र, येथे स्थायिक झालेले गुन्हेगारी प्रवृत्तीचे काही विदेशी नागरिक आणि परप्रांतीय कामगार यांच्यामुळे गोव्याची ही ओळख काहीशी पुसट होत आहे. परप्रांतीय आणि विदेशी नागरिकांमधील वाढती व्यसनाधिनता आणि त्यातून उद्भवणार्‍या गुन्हेगारीच्या घटना जणू गोव्याच्या मुळावरच उठल्या आहेत. वेळोवेळी कारवाईचा बडगा उगारून गुन्हेगारीला आळा घालणे आणि गुन्हेगारांवर वचक ठेवण्याचे मोठे आव्हान गोवा पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

अमली पदार्थ बाळगणे, विक्री करणे आदीप्रकरणी नायजेरियनांवर कारवाईच्या घटना वारंवार निदर्शनास येतात. यामध्ये चरस, ब्राऊन शुगर, कोकेन, एलएसडी आदीचा समावेश आढळून येतो. हे सर्व अमली पदार्थ विशेषत: विदेशातूनच आणले जातात. यात शक्यतो विदेशींचाच सहभाग असतो हे आजवरच्या कारवायांमधून उघड झाले आहे. त्यातच आता गांजा या नशेच्या वनस्पतीचा देशी आविष्कारही सामील झाला आहे. गांजाची नशा करणे, जवळ बाळगणे किंवा विक्री करण्याची प्रकरणे वारंवार गोव्यात घडताना दिसतात. यामध्ये पोलिसांकडून अटकेची कारवाई केली जाते, मात्र पुन्हा ये रे माझ्या मागल्या... अशीच काहीशी स्थिती आहे.

दाबोळीवर सोने तस्करी, अमली पदार्थांची तस्करी असो किंवा बेकायदा विदेशी चलन असो, या कारवायांमध्ये परराज्यांतील व्यक्‍ती किंवा विदेशींचा सहभाग असूनही नाव मात्र गोव्याचेच पुढे येते. मध्यंतरी तर चोरट्यांनी राज्यात अक्षरश: धुमाकूळच घातला होता. घरफोड्यांसह ज्वेलरी दुकाने फोडणे, मंदिरांतील वाढत्या चोर्‍या, एवढेच काय बँकांचे एटीएम फोडण्यापर्यंतच नव्हे तर एटीएम मशिन पळवून नेण्यापर्यंत चोरट्यांची मजल गेली. अल्पवयीन मुलांच्या अपहरणाच्या घटनाही वारंवार  घडत असतात.

परराज्यांतून आणलेल्या मुली, तरुणींना वेश्या व्यवसायास लावण्याच्या घटनाही वरचेवर उघडकीस येतात. यामध्ये परराज्यातील युवतींसह, दलालांवर कारवाई केली जाते; तरीही अशी प्रकरणे सातत्याने उघडकीस येतात. त्यातच विनयभंग, बलात्काराच्या घटनांनीही गोव्याच्या प्रतिमेला तडा गेला आहे. बेतालभाटी येथील किनार्‍यावर घडलेल्या युवतीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेने तर एकच खळबळ उडाली. या घटनेसह यापूर्वी समुद्र किनार्‍यांवर घडलेल्या अशाच प्रकारच्या घटनांमुळे केवळ गोव्यातील समुद्र किनार्‍यांची सुरक्षाच नव्हे तर एकंदर पर्यटनावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. सामूहिक बलात्कार प्रकरणातील सर्व संशयित उत्तर प्रदेशातील सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांसह अनेक गुन्हे केल्याचे पोलिस कारवाईत उघड झाले आहे. एवढेच काय अन्य राज्यांतील मोस्ट वाँटेड आणि तडीपार गुन्हेगार गोव्याच्या आश्रयाला येत असल्याचेही वेळोवेळी  उघडकीस आले आहे. या सर्व गुन्हेगारीच्या घटनांमध्ये गोव्याबाहेरील व्यक्‍तींचा, गुन्हेगारांचा सहभाग असूनही बदनामी मात्र गोव्याच्याच वाट्याला येते. या सर्वाला आळा घालून गोव्याची मलिन झालेली प्रतिमा पुन्हा उजळण्यासाठी धडक कारवाईचे हत्यार उपसून गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्याचे आव्हान गोवा पोलिसांसमोर ठाकले आहे. हे शिवधनुष्य गोवा पोलिस आणि गोवेकर कसे पेलतात हे येणार काळच सांगेल.