Wed, Nov 21, 2018 21:29होमपेज › Goa › ‘स्पीड गव्हर्नर’ची सक्‍ती टॅक्सींबाबत शिथिल?

‘स्पीड गव्हर्नर’ची सक्‍ती टॅक्सींबाबत शिथिल?

Published On: Sep 10 2018 1:16AM | Last Updated: Sep 09 2018 11:40PMपणजी : प्रतिनिधी

पर्यटक आणि अन्य प्रवासी वाहतूक करणार्‍या राज्यातील टॅक्सींसाठी ‘स्पीड गव्हर्नर’ बसवण्याची गरज नाही, अशी नियमात दुरूस्ती करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. अशी दुरूस्ती झाल्यास राज्यातील हजारो टॅक्सी व्यावसायिकांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यातील टॅक्सींसाठी ‘स्पीड गव्हर्नर’ बसवले गेले तर प्रति किलोमीटर ताशी 80 कि.मी.पेक्षा जास्त वेगाने वाहन हाकता येणार नाही. त्यामुळेआम्हाला स्पीड गव्हर्नर नको, अशी मागणी टॅक्सी व्यावसायिक व अन्य वाहन मालक करत होते. टॅक्सी व्यावसायिकांनी व इतरांनी याबाबत खासदारांना तसेच गोवा सरकारमधील मंत्री व आमदारांना निवेदनेही दिलेली आहेत. 

केंद्र सरकारने टॅक्सींसह सर्व वाहनांना स्पीड गव्हर्नर बसवणे सक्तीचे केले होते. अनेक वाहनांनी स्पीड गव्हर्नर लागू करण्याच्या केंद्राच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली होती तर काही वाहनधारकांनी याला विरोध केला होता. जनतेकडून मोठ्या प्रमाणावर आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वापराच्या वाहनांना स्पीड गव्हर्नर लागू करण्याबाबतच्या निर्णयाचा केंद्र सरकार आता फेरआढावा घेणार आहे.