Fri, Jul 19, 2019 00:54होमपेज › Goa › फोंडा पालिका निवडणुकीसाठी भाजप, मगो, काँग्रेसची तयारी

फोंडा पालिका निवडणुकीसाठी भाजप, मगो, काँग्रेसची तयारी

Published On: Apr 06 2018 1:28AM | Last Updated: Apr 06 2018 1:07AMफोंडा : प्रतिनिधी

फोंडा पालिकेची निवडणूक 29 एप्रिल रोजी होणार असून त्यासाठी भाजप, मगो व काँग्रेसने आपापले उमेदवारनिवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यासाठी जय्यत तयारी केली आहे.शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरूवात होणार असल्याने कायदेशीर सोपस्कर पूर्ण करण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. 15 प्रभागांतून एकूण 100 हून अधिक उमेदवार अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत.  

गेल्या निवडणुकीत भाजप व मगोने युती करून पालिका काबीज केली होती.  मात्र, सध्या फोंडा मतदारसंघात भाजप- मगो कार्यकर्त्यांच्या संघर्षाचा  अनुभव मतदारांनी घेतला आहे. यावेळच्या निवडणुकीचे चित्र वेगळे असून भाजप, मगो व काँग्रेस पक्षानी आपापले उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे. भाजप-मगो युतीचे सरकार असून सुद्धा फोंडा मार्केट सोपो कर प्रश्‍न अजूनही प्रलंबित आहे. गेल्या पाच वर्षांत या विषयावर केवळ राजकारण झाल्याचे विक्रेते सांगतात. त्यामुळे उमेदवारांकडून विक्रेत्यांना नवीन आश्वासने मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. विक्रेत्यांसाठी बांधलेले व सध्या पांढरा हत्ती ठरलेला मार्केट प्रकल्प सुरू करण्यात मागील पालिका मंडळाला अपयश आले. सोपो करासाठी विक्रेत्यांनी केलेल्या आंदोलनामुळे अनेक विक्रेत्यांवर गुन्हे नोंद आहेत. मात्र, विक्रेत्यांमध्ये फूट घालण्यात मंडळाला यश आले तरी त्याचा वचपा येणार्‍या निवडणुकीत काढण्याची संधी फोंडावासीयांना मिळाली आहे. 

फोंडा शहरात मलनिसारण प्रकल्प होणे आवश्यक आहे. बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी प्रकल्पाचे काम सुरू केल्यावर सुरुवातीला पालिकेच्या काही नगरसेवकांनी विरोध दर्शविला होता. त्यामुळे भाजप व मगो कार्यकर्त्यांमध्ये झालेला संघर्ष फोंडावासीयांना पहायला मिळाला. तसेच क्रांती मैदानाच्या नूतनीकरणाला पालिकेने विरोध दर्शवून ना हरकत दाखल दिला नव्हता. याची आठवण फोंड्यातील मतदारांना आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत उमेदवार कोणते नवीन प्रश्‍न घेऊन लोकांसमोर जाणार हे प्रचारावेळी दिसून येणार आहे. तसेच फोंडावासीयांना दररोज भेडसावणार्‍या वाहतूक समस्येवर अजूनपर्यंत तोडगा निघालेला नाही. त्यामुळे उमेदवारांकडून पार्किंग समस्या सोडविण्याचे आश्वासन मतदारांना मिळण्याची शक्यता आहे.    

पालिकेचे कित्येक माजी नगरसेवक पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांनी फोंडा प्रागतिक नागरिक मंच यानावाने आपले पॅनेल रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. अजूनपर्यंत उमेदवारांची नावे जाहीर झाली नसली तरी येत्या दोन- तीन दिवसांत नावे जाहीर होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त होत आहे.मगो पक्षाने तर फोंड्यातील अनेकांना पक्षात प्रवेश देण्याचा धडाका लावला आहे. डॉ. केतन भाटीकर यांच्या नेतृत्वाखाली फोंड्यातील पालिका काबीज करण्याचे ध्येय ढवळीकर बंधूनी बाळगले आहे. मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी तर काही दिवसापूर्वी पत्रकार परिषदेत पालिकेबरोबर फोंडा मतदारसंघ काबीज करण्याची तयारी सुरु केल्याची घोषणा केल्याने भाजप व काँग्रेसच्या नेत्यांनी वेगळ्या रणनीतीकडे लक्ष दिल्याचे दिसून येते. फोंडा पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केलेले काही इच्छुक उमेदवार सध्या अधूनमधून भाजप, मगो तसेच काँग्रेसच्या नेत्याकडे चर्चा करताना दिसतात. त्यामुळे उमेदवार कोणत्या पक्षाचा समर्थक आहे हे ओळखणे कठीण होऊन बसले आहे.

Tags : Goa, election, Fonda Municipality, BJP, Maharashtrawadi Gomantak Party, Congress, preparations