Fri, Apr 19, 2019 07:58होमपेज › Goa › गोवा संस्कृतीचा खजिना

गोवा संस्कृतीचा खजिना

Published On: Mar 04 2018 1:24AM | Last Updated: Mar 04 2018 1:01AMफोंडा : प्रतिनिधी 

गोवा संस्कृतीचा  खजिना आहे. या राज्यात प्रत्येकाचे हृदय परंपरा पुढे नेण्यास सिद्ध आहे, असे प्रतिपादन राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा  यांनी केले. अंत्रुज महाल शिमगोत्सव समिती व पर्यटन खात्यातर्फे आयोजित केलेल्या शिमगोत्सव मिरवणुकीचा प्रारंभप्रसंगी राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा  बोलत होत्या. त्यांच्या  हस्ते दीपप्रज्वलनाने शिमगोत्सवास प्रारंभ झाला.

राज्यपाल सिन्हा म्हणाल्या, की भविष्यात गोव्यातील लोकसंस्कृती संबंधी लिखाण करण्याची आपली इच्छा आहे. गोव्यातील शहरात ग्रामीण भागाचा सुगंध आहे. प्रत्येक उत्सवात तीन पिढ्या सहभागी होतात. त्यामुळे समाज समृद्ध होण्यास मदत होते. सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले, की गोव्याची संस्कृती टिकवून ठेवण्याची आज आवश्यकता आहे. पाश्‍चात्य संस्कृतीकडे वळण्यापासून नवीन पिढीला मार्गदर्शन करण्याची गरज आहे. 

खासदार नरेंद्र सावईकर, आमदार दीपक पाऊसकर, उपनगराध्यक्ष शांताराम कोलवेकर, नगरसेवक विश्वनाथ दळवी, माजी आमदार जाईल आगियर, निधी मामलेकर, व्यंकटेश नाईक, शिवानंद सावंत, गीताली तळावलीकर व अन्य मान्यवर होते.  मिरवणुकीत रोमटामेळत सहभागी  झालेल्या पथकांनी उपस्थितांची मने जिंकली. अनेक कलाकारांनी विविध प्रकारच्या व पारंपरिक वेशभूषा सादर केल्या. शिमगोत्सव मिरवणुकीसाठी शहरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मिरवणुकीमुळे शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला. वाहतूक पोलिसांनी वाहतुकीवर नियंत्रण ठेवले होते.