Mon, Jun 24, 2019 21:22होमपेज › Goa › परराज्यातील ऊसतोडीसाठी 5 कोटी अ‍ॅडव्हान्स

परराज्यातील ऊसतोडीसाठी 5 कोटी अ‍ॅडव्हान्स

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

फोंडा : वार्ताहर

स्थानिक शेतकर्‍यांना विश्‍वासात न घेता गोव्याबाहेरील शेतकर्‍यांना ऊस तोडणीसाठी लागणार्‍या टोळ्यांसाठी संजीवनीतर्फे प्रशासकांनी 5 कोटी 10 लाख रुपये कंत्राटदाराला आगाऊ दिल्याने तसेच कारखाना अद्याप  सुरु न झाल्याने राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांत नाराजी पसरली आहे.धारबांदोडा येथील संजीवनी साखर कारखान्याचा गळीत हंगाम दि. 14 नोव्हेंबर रोजी  सुरू करण्यात आला असला तरी यंत्रात बिघाड   झाल्याने कारखाना अद्याप सुरू करण्यात आलेला  नाही.

 गोव्यातील 147 तर कर्नाटकातून 116 टन मिळून एकूण 263 टन ऊस सध्या कारखान्यात विनावापर पडून आहे. गेल्या वर्षी गोव्याबाहेरून फक्त   7 हजार टन ऊस आल्याने कारखाना लवकर बंद करण्याची पाळी आली होती. त्याची दखल घेऊन यंदा अधिक ऊस आणण्यासाठी गोव्याशेजारील तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी खास योजना आखण्यात आली आहे. 

संजीवनीतर्फे गोव्याबाहेरील ऊस उत्पादकांना तोडीसाठी सुमारे 110 टोळ्या तर गोव्यातील ऊस उत्पादकासाठी 40 टोळ्यांची   सोय करण्यात आली आहे.  त्यासाठी कंत्राटदाराला 5 कोटी 10 लाख रुपये आगाऊ देण्यात आले आहे. मात्र आणखीन 2 लाख 40 हजार रुपये आगाऊ दिल्याशिवाय टोळ्या दाखल होणार नसल्याने कारखान्याच्या अधिकार्‍यांसमोर  अडचणी  निर्माण झाल्या आहेत. संजीवनीतर्फे कंत्राटदाराशी करार करूनच आगाऊ रक्कम देण्यात आली आहे. तसेच कंत्राटदाराकडून कोरा धनादेश  घेण्यात आला आहे,असे कारखान्याच्या सूत्रांनी सांगितले.

सध्या 40 टोळ्या गोव्यात दाखल होण्याच्या मार्गावर असल्याने गोव्यातील उसाची तोडणी लवकर सुरु होण्याचे संकेत मिळत आहेत. परंतु संजीवनीचा पूर्वेतिहास पाहता कंत्राटदाराला टोळ्यांसाठी आगाऊ रक्कम दिल्याने त्याचा फटका संजीवनीला बसलेला आहे  ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी सांगितले,की वन्य जीवांमुळे शेतकर्‍याचे मोठे नुकसान होत असून संजीवनी साखर कारखाना लवकर सुरू होणे गरजेचे आहे.  

 ‘संजीवनी’चे प्रशासक उमेशचंद्र जोशी यांनी सांगितले,की कारखान्याची यंत्रे जुनी झाल्याने त्यांचे सुटे भाग सहज मिळत नाहीत. सध्या निकामी झालेला यंत्राचा  सुटा भाग सापडला असून सोमवारपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर मंगळवार पासून कारखाना सुरु करण्यात येणार आहे.