Sun, Apr 21, 2019 00:23होमपेज › Goa › संसद ग्राम योजनेंतर्गत ‘कुळे’ला दत्तक घेणार

संसद ग्राम योजनेंतर्गत ‘कुळे’ला दत्तक घेणार

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 24 2017 11:27PM

बुकमार्क करा

फोंडा ः वार्ताहर

सावर्डे मतदारसंघातील कुळे ग्रामपंचायत क्षेत्रात पाणी, वीज, रस्ते, शिक्षण  व आरोग्य सुविधा पुरविण्यासह दूधसागर धबधब्यावर पर्यटनासाठी येणार्‍या देशी-विदेशी पर्यटकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संसद ग्राम योजनेंतर्गत कुळे पंचायत क्षेत्र दत्तक घेणार असल्याची माहिती राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर यांनी रविवारी दिली. तेंंडुलकर म्हणाले, पंचायत संसद योजनेंतर्गत कुळे दत्तक घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी  धारबांदोडा उपजिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक झाली. कुळे पंचायत क्षेत्रात पाणी, वीज, रस्ते व आरोग्याची सुविधा चांगल्या प्रकारे मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक सुविधा नसल्याने रुग्णांना पिळये-धारबांदोडा किंवा कुडचडे आरोग्य केंद्रात न्यावे लागते. मूलभूत सुविधा पुरविण्याबरोबर तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न संसद ग्राम योजनेंतर्गत केला जाईल. यासाठी लवकरच कुळे ग्रामसभेत ठराव घेतला जाईल.

जगप्रसिद्ध दूधसागर धबधबा पाहण्यासाठी कुळे येथे दररोज सुमारे अडीच हजार देशी-विदेशी पर्यटक येतात. पर्यटकांमुळे पंचायत क्षेत्रातील काही युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. कुळे पंचायत क्षेत्रात सर्वेक्षण करून बेरोजगारांनानोकर्‍या उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. लोकांना शिक्षण व आरोग्य सेवा उपलब्ध करून देताना पंचायत क्षेत्रात एक टन क्षमतेचा कचरा प्रकल्प उभारला जाईल. पर्यटकांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचतो. स्थानिक पंचायत कचरा उचलण्याचे काम चांगल्याप्रकारे करीत आहे. कचर्‍याची  योग्य प्रकारे विल्हेवाट लावल्यास स्वच्छ भारत अभियान यशस्वी होण्यास मदत होईल, खासदार विनय तेंडुलकर यांनी सांगितले. बैठकीस धारबांदोड्याचे उपजिल्हाधिकारी आग्नेलो फर्नांडिस, कुळे पंचायतीचे सरपंच, पंचायत सदस्य व सरकारच्या विविध खात्यातील अधिकारी उपस्थित होते.