Tue, Feb 18, 2020 07:17होमपेज › Goa › किर्लपाल-दाबाळ पंचायत क्षेत्रात नव्याने घरपट्टी आकारणी

किर्लपाल-दाबाळ पंचायत क्षेत्रात नव्याने घरपट्टी आकारणी

Published On: Jan 15 2018 1:41AM | Last Updated: Jan 15 2018 12:28AM

बुकमार्क करा
फोंडा : प्रतिनिधी

किर्लपाल दाबाळ   पंचायत क्षेत्रातील पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी ‘जायका’ प्रकल्पांतर्गत जलवाहिनी प्रत्येक गावापर्यंत घालावी, पंचायत क्षेत्रातील प्रत्येक  घराचे क्षेत्रमापन  करून नव्याने घरपट्टी आकारण्याचा महत्वपूर्ण ठराव रविवारी झालेल्या किर्लपाल दाबाळ पंचायतीच्या ग्रामसभेत घेण्यात आला. याशिवाय स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन कचरा गोळा करून प्रत्येकाकडून दरवर्षी 200 रुपये आकारण्याचेही सर्वानुमते निश्‍चित करण्यात आले.

सरपंच शकुंतला गावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या ग्रामसभेत पाणी पुरवठा सुरळीत होत नसून हा प्रश्‍न आधी सोडवा,अशी मागणी ग्रामस्थांनी  केली. पाणी पुरवठा सुरळीत होत नसला तरी दर महिन्याला पाण्याची बिले न चुकता कशी दिली जातात,असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावर उपसरपंच शशिकांत गावकर यांनी पंचायत तर्फे बांधकाम खात्याच्या पाणी विभागाकडे प्रतिदिन 5 टँकर मधून पाणी पुरवठा करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे, असे  सांगितले.

स्थानिक आमदार दीपक पाऊसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत मंडळ व बांधकाम खात्याचे अभियंत्याची बैठक दीड महिन्यापूर्वी होऊन पाणीप्रश्‍नी आढावा घेण्यात आला होता.  तसेच विविध ठिकाणी पंपांवर काम कारणार्‍या कामगारांना लोकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या जायका प्रकल्पाची जलवाहिनी काही मर्यादित  गावांपुरती घालण्यात आली असून उर्वरित गावात घालण्यासाठी संबंधित खात्याकडे  पाठपुरवठा करणार असल्याचे उपसरपंचानी  सांगितले.

पंचायत क्षेत्रातील कचरा गोळा करण्यासाठी दोन कामगार नियुक्त करण्यात आले असून प्रत्येक घरातील कचरा घरोघरी फिरून गोळा करण्यात येत आहे. लोकांनी आपला कचरा उभारण्यात सदर कामगारांना सहकार्य करण्याची गरज आहे. प्रत्येक घरमालकाकडून दरवर्षी 200 रुपये कचर्‍यासाठी घेण्यात येणार आहे. सरकारकडून दरवर्षी 365 रुपये आकारण्याचा आदेश आहे. मात्र पंचायत मंडळाने बैठक घेऊन लोकांकडून फक्त 200 रुपये आकारण्याचा निर्णय घेतला आहे.  किर्लपाल पंचायत क्षेत्रात दहा वर्ष पूर्वी प्रत्येक घराची मोजमाप करण्यात आले होते. यावर्षी प्रत्येक घराचे मोजमाप करून घरमालकाकडून घरपट्टी घेण्यात येईल.

कारण लोकांनी घराची  दुरुस्ती करताना घराचा आकार  वाढविल्याचे निदर्शनात  आले आहे. पंचायतीचे सचिव व स्थानिक पंचायत सदस्यांना घेऊनच सदर कामाची  सुरुवात करण्यात येणार असल्याचे शशिकांत गावकर यांनी सांगितले. दाबाळ येथील नदीवर मोठ्या संख्येने पर्यटक आंघोळीसाठी येतात. त्यामुळे दरवर्षी पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रकार घडत असून नदीजवळ धोक्याची सूचना देणारे फलक लावण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली आहे. ग्रामसभेत सरपंच शकुंतला गावकर, पंच सदस्य  रमाकांत गावकर,मोहन गावकर, तुळशीदास गावकर, कल्पेश गावकर, भालचंद्र नाईक, अनिता प्रभू, चंदा गावकर, पंचायतीचे सचिव शशांक गावस देसाई, व निरीक्षक म्हणून गट विकास कार्यालयाचे अधिकारी माया खांडेपारकर उपस्थित  होते.