Thu, Jun 27, 2019 18:12होमपेज › Goa › बिंबल-कुळेत घराला आग; पाच लाखांची हानी

बिंबल-कुळेत घराला आग; पाच लाखांची हानी

Published On: Feb 10 2018 1:30AM | Last Updated: Feb 10 2018 12:32AMफोंडा  : प्रतिनिधी

बिंबल कुळे येथील सखाराम च्यारी यांच्या घराला शुक्रवारी सकाळी आग लागून घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. आगीत रोख 35 हजार रुपये, एक संगणक, लॅपटॉप, सायकल व सुतारकामाच्या सर्व साहित्याचा समावेश असून एकूण 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा घरमालकाने केला आहे. घरात गॅस सिलिंडर नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र आगीचे कारण अजून स्पष्ट झाले नाही. 

सखाराम च्यारी घराच्या मुख्य दरवाजाला कुलूप लावून शुक्रवारी सकाळी 8. 30 वाजण्याच्या सुमारास कुळे येथे बाजारात गेले होते. सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास गावातील व्यक्तींनी घराला आग लागल्याची माहिती दिली. ग्रामस्थांनी त्वरित फोनवरून अग्निशामक दलाला कळविले. मात्र कुडचडेहून अग्निशामक दलाचा बंब 11.30 वाजण्याच्या  सुमारास घटनास्थळी पोहोचला. तोवर संपूर्ण घर जळून भस्मसात झाले होते.

आग लागली त्यावेळी घरात कुणीच नव्हते. आगीमुळे जुन्या मातीच्या भिंतीही कोसळल्या. काही दिवसांपूर्वीच काही कारणासाठी सखाराम च्यारी यांनी घरात 35 हजार रुपये ठेवले होते. तसेच काही लोकांनी दुरुस्तीसाठी ठेवलेल्या मोटर आगीत जाळून खाक झाल्या. आग लागली तेव्हा घरात गॅस सिलिंडर नव्हता. त्यामुळे  अनर्थ टळला. आगीमुळे परिसरातील झाडे व एक माडही जळून गेला .  सखाराम च्यारी यांनी  सांगितले, आगीत घरातील संपूर्ण प्रापंचिक साहित्य जळून गेले असून सुमारे 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहेे. सरपंच मनीष लांबोर व स्थानिक पंच लक्ष्या डोईफोडे यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन पाहणी केली.  

कुळे परिसरात एखाद्यावेळी आग लागण्याची दुर्घटना घडल्यास लोकांना फोंडा, वाळपई किंवा कुडचडेहून अग्निशामक दलाच्या कार्यालयात बंबासाठी संपर्क साधावा  लागतो. त्यामुळे कुळे परिसरात अग्निशमन दलाचे कर्मचारी पोहोचेपर्यंत उशीर होऊन आगीत संपूर्ण साहित्य  भस्मसात होण्याचा प्रकार घडतो. सरकारने  मोले परिसरात कार्यालय सुरु करण्याची प्रक्रिया सुरु  केली आहे. मात्र तातडीने   अग्निशमन दलाचे कार्यालय उभारावे, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.