Mon, Aug 19, 2019 09:45होमपेज › Goa › फोंड्यात फिजीओथेरपी सेंटर सुरू करणार

फोंड्यात फिजीओथेरपी सेंटर सुरू करणार

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 12 2018 10:19PM

बुकमार्क करा
फोंडा : वार्ताहर

ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुखमय होण्यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.  विशेष म्हणजे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम  प्राधान्याने हाती घेतले आहे. ज्येष्ठाना विरंगुळा मिळण्यासाठी फोंडा शहरात नाना नानी पार्क बांधले जाणार आहे.  तसेच फिजीओथेरपी सेंटर सुरू करून ज्येष्ठाना त्याचा फायदा करून दिला जाणार आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले. प्रोबोस क्‍लब ऑफ हिल टाऊन, माधवराव ढवळीकर ट्रस्ट आणि ज्येष्ठ नागरीक फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने बांदोडा येथील भाऊसाहेब बांदोडकर क्रीडा मैदानावर आयोजित केलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या क्रीडा मेळाव्यात  प्रमुख अतिथी या नात्याने मंत्री ढवळीकर बोलत होते.व्यासपीठावर  सन्माननीय पाहुणे म्हणून दक्षिण गोव्याचे खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर, बांदोडा सरपंच रामचंद्र नाईक, क्रीडा प्रकल्प प्रमुख निलम मयेकर, ज्येष्ठ नागरिक फोरमचे अध्यक्ष दिलीप कामत, प्रोबोस क्‍लबचे उपाध्यक्ष मनोहर तिळवे, सचिव जयवंत आडपईकर  उपस्थित होते.

मंत्री ढवळीकर म्हणाले, की फोंडा शहरातील धूळ प्रदूषण दूर करण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जाणार आहेत. ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणारे प्रश्‍न सोडवण्यास आपण प्रयत्न करणार आहे. खासदार अ‍ॅड. सावईकर म्हणाले, की जेष्ठ नागरिकांनी आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून मनाचे तारूण्य ठेवल्यास आनंदाने जीवन जगता येईल. वाचन, आहार, व्यायाम याकडे लक्ष दिल्यास जीवन सुखकर होईल. सरपंच नाईक म्हणाले, की आजच्या युवा पिढीने आपल्या वृध्द आई वडिलांना वृद्धाश्रमात न ठेवता त्यांना घरीच ठेवून त्यांची सेवा करावी. ज्येष्ठ नागरीक हे समाजाला मार्गदर्शक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाचा पाल्यांना लाभ घ्यावा. मेळाव्याला प्रा. सुमन सावंत, कुंडईचे सरपंच रामु नाईक, आडपईचे सरपंच सरोज नाईक, पंचायत सदस्य मशाल आडपईकर व तालुक्यातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिलीप कामत यांनी स्वागत केले. अशोक कुरी यांनी सूत्रसंचालन केलेे.  जयवंत आडपईकर यांनी आभार मानले.