होमपेज › Goa › फोंडा शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य

फोंडा शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य

Published On: Dec 24 2017 1:43AM | Last Updated: Dec 23 2017 11:18PM

बुकमार्क करा

फोंडा ः वार्ताहर

फोंडा शहरात गेल्या वर्षापासून मलनिस्सारण प्रकल्पाचे काम सुरू आहे. रस्ता खोदून त्यात वाहिन्या घालण्याचे काम सर्वत्र दिसून येते. तसेच सध्या गॅस वाहिन्या घालण्याचे काम सुरू झाले असल्याने रस्त्याची दुर्दशा झाली असून सर्वत्र खड्डेच खड्डे झाले आहेत.   हे खड्डे वाहन चालकांना त्रासदायक ठरत आहेत. मलनिस्सारण प्रकल्पाचे काम संथपणे सुरू आहे. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी व्यक्त केली जातेे. रस्ता सर्वत्र  खोदण्यात येत असल्याने वाहन चालकांची तारांबळ उडत आहे. खोदलेल्या रस्त्यांची दुरूस्ती व्यवस्थितपणे न केल्याने वारंवार अपघात घडतात. 

रस्ते खोदल्यामुळे परिसरातील दुकानात व घरात घुळीचे साम्राज्य पसरले आहे. काही मोजक्याच ठिकाणी रस्त्यावर टँकरने पाणी मारले जाते.  इतरत्र मात्र धूळ पसरते. काही ठिकाणी फलक लावण्यात आले नसल्याने रात्रीच्यावेळी वाहन चालकांना अंदाज येत नसल्यामुळे खड्ड्यात वाहने पडण्याचे प्रकार वाढत आहेत.  खड्ड्यांतून वाहने जात असल्यामुळे वाहनाची मोडतोड होते. तसेच दुचाकीस्वारांचे कंबर व मान दु:खण्याचे प्रकार  वाढले आहेत. त्यासाठी काम पूर्ण झाल्यावर रस्त्याची दुरूस्त करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. 

खड्ड्यांमुळे अनेक दुचाकीस्वारांना कंबर व मान दुखण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. सरकारने लोकांच्या आरोग्याची काळजी घेवून प्रकल्पाचे काम केले पाहिजे. मात्र अनेक दिवसांपासून काम रखडत असल्याने त्याचा त्रास लोकांना सहन करावा  लागत आहे. मलनिस्सारण व गॅस वाहिन्या घालण्याचे काम सध्या सुरू असून  भविष्यात भूमिगत वीज वाहिन्या घालताना पुन्हा रस्ते खोदण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे लोकांना पुन्हा त्रास सोसावा लागणार आहे. याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे, असेही अ‍ॅड. रामदास गावडे यांनी  सांगितले. 

अशोक नाईक म्हणाले, की रस्ता खोदल्याने परिसरातील दुकानात तसेच घरात धूळ पसरत आहे. रस्त्यावर व्यवस्थितपणे पाणी मारण्यातयेत नाही. कामावर कुणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येते.एक ठिकाणचे काम पूर्ण न करताच दुसर्‍या ठिकाणी रस्ता खोदून लोकांना त्रास देणे चुकीचे आहे. एक काम पूर्ण झाल्यावर रस्त्याची दुरूस्तीही  केली पाहिजे, असे ते म्हणाले. सुनील गावकर हा युवक म्हणाला,  खड्डेमय रस्त्यामुळे वाहने नादुरुस्त होण्याचे प्रकार वाढले आहेत.