Mon, May 20, 2019 11:27होमपेज › Goa › उसगाव जंक्शनवर रात्रीत शिवाजी महाराजांचा पुतळा

उसगाव जंक्शनवर रात्रीत शिवाजी महाराजांचा पुतळा

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 21 2018 1:21AM फोंडा  :  प्रतिनिधी

तिस्क उसगाव येथील  जंक्शनवर सोमवारी रात्री अज्ञातांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला असून रहदारीला अडथळा ठरून पुतळ्याला  वाहनांची धडक बसण्याची शक्यता आहे. पुतळा उभारण्यासाठी आवश्यक परवाना घेतला नसल्याचेही उघड झाले असून धोकादायक ठिकाणी पुतळा उभारल्याने  परिसरात तो  चर्चेचा विषय बनला आहे. यासंबंधी मंगळवारी (दि.20) उशिरापर्यंत पोलिस तक्रार दाखल झाली नव्हती. 
उसगाव जंक्शनवर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्याची  माहिती मंगळवारी सकाळी सर्वत्र पसरली.  

पुतळा उभारलेल्या ठिकाणी एक धोकादायक विजेचा खांब वाकलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे पुतळा उभारण्यामागचे रहस्य काय, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. सोमवारी रात्री तिस्क उसगाव येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर अज्ञातांनी हा पुतळा उभारल्याचे बोलले जात आहे. हा पुतळा उभारल्याची जबाबदारी अजून कोणीच घेतलेली नाही. सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष नरेश नाईक यांनी सांगितले की, पुतळा कोणी व कोणत्या हेतूने उभारला याची आपल्याला माहिती नाही. मात्र तिस्क-उसगाव परिसरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची गरज   होतीच.

मात्र, जंक्शनवर उभारलेल्या पुतळ्याला धोका असून योग्य जागेवर तो उभारण्याची गरज आहे. त्यासाठी मंडळ सदस्यांची व बाजारातील  व्यापार्‍यांची बैठक घेऊन निर्णय घेणार आहोत. उपसरपंच रामनाथ डांगी म्हणाले की, तिस्क उसगाव बाजारात सध्या खनिज वाहतुकीमुळे पादचार्‍यांना अडथळा निर्माण होतो. त्यात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्याने अपघाताची शक्यता आहे. शिवाजी महाराजांबद्दल सर्वांना आदर आहे. त्यामुळे पुतळ्याची योग्य निगा राखण्याबरोबर सुरक्षित जागी तो उभारण्याची गरज असल्याचे सांगितले. सरपंच अस्मिता गावडे यांनी सांगितले की, पुतळा उभारण्यासाठी कोणताही परवाना घेतलेला नाही. मात्र  पुतळा उभारलेली जागा योग्य नाही.       

‘तो’ शिवपुतळा हटवू नये

तिस्क उसगाव येथे सोमवारी (दि.19) रात्री अज्ञातांनी उभारलेला शिवाजी महाराजांचा पुतळा तेथून हटवू नये, असा निर्णय सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व बाजारकर दुकानदारांच्या  मंगळवारी (दि.20)संध्याकाळी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पुतळा स्थापनेसंबंधीचे कायदेशीर सोपस्कार पूर्ण करण्यासाठी नव्या समितीची निवड करण्यात आली. 

नवनियुक्‍त समितीचे अध्यक्ष नरेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदर पुतळा त्याच ठिकाणी ठेवण्याचा निर्णय   घेण्यात आला. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गोविंद परब फात्रेकर व अन्य सदस्य उपस्थित होते.  बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना नरेश नाईक यांनी, शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच ठिकाणी ठेवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यासाठी पुतळ्याची उंची वाढविण्याचा निर्णय झाला. तसेच सदर जागा बांधकाम खात्याची असल्याने त्यासाठी आवश्यक असलेले कायदेशीर सोपस्कार करण्यासाठी समितीची निवड करण्यात आली असल्याचे सांगितले.