Sun, Mar 24, 2019 12:28होमपेज › Goa › मामलेदारांनी राजीनामा द्यावा; अन्यथा निलंबनाची मागणी करू

मामलेदारांनी राजीनामा द्यावा; अन्यथा निलंबनाची मागणी करू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

फोंडा  : प्रतिनिधी

फोंडा मतदारसंघाचे माजी आमदार तथा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सरचिटणीस लवू मामलेदार यांना ढवळीकर बंधूंवर विनाकारण टीका करण्याचा अधिकार नसून त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा  केंद्रीय समितीला कळवून त्यांना निलंबित करण्याची मागणी  करू, असा इशारा फोंडा मगो मंडळाचे अध्यक्ष अनिल नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिला. माजी आमदार मामलेदार यांनी मागील 5 वर्षांच्या कालावधीत फोंड्यात कोणताच विकास केला नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मगोच्या नेत्यांविरुद्ध टीका करण्याचे सत्र त्यांनी सुरू केले आहे. मंत्री सुदिन ढवळीकर व मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्यामुळे मगो पक्षाचे अस्तित्व टिकून राहिले आहे. त्यामुळे लवू मामलेदार यांनी पक्षात राहून नेत्यांवर टीका करू नये. मामलेदार यांनी राजीनामा न दिल्यास केंद्रीय समितीला पत्र पाठवून पक्ष विरोधी कारवाई केल्याबद्दल त्यांना निलंबित करण्याची मागणी करणार असल्याचे अनिल नाईक यांनी सांगितले. 

माजी आमदार मामलेदार यांना त्यावेळी पालिकेतील भाजपच्या नगरसेवकांनी काम करू दिले नाही, हे सत्य आहे. मात्र, सध्याची स्थिती वेगळी असून फोंड्यात मगो पक्ष बळकट करण्यासाठी कार्यकर्ते डॉ.केतन भाटीकर यांच्यासोबत आहेत. फोंडा पालिकेच्या निवडणुकीत मगो पक्ष स्वबळावर निवडणूक लढवून 15 पैकी 8 उमेदवार निवडून आणणार असल्याचे अनिल नाईक यांनी सांगितले. फोंडा पालिका क्षेत्रात मगो पक्ष बळकट होत असून सर्व 43 बुथ स्तरावरील कार्यकर्ते परिसरावर लक्ष ठेवून आहेत. येत्या 10 दिवसांत मगो पक्ष आपल्या पॅनलचे उमेदवार जाहीर करणार आहे, असेही नाईक म्हणाले. या पत्रकार परिषदेत राजू कोलवेकर, सुदेश नार्वेकर, मिलिंद वळवईकर व अन्य मगो कार्यकर्ते उपस्थित होते. 
 


  •