Mon, Jan 21, 2019 04:59होमपेज › Goa › पोटच्या मुलाचा दोन लाखांत सौदा

पोटच्या मुलाचा दोन लाखांत सौदा

Published On: Apr 07 2018 1:40AM | Last Updated: Apr 06 2018 11:10PMफोंडा : प्रतिनिधी

आपल्या पोटच्या 11 महिन्यांच्या अर्भकाचा दोन लाख रुपयांना सौदा केल्याप्रकरणी आईसमवेत अमर मोरजी (वय 38), अनंत दामाजी (34) व योगेश गोसावी (42, तिघेही रा.पेडणे ) या तिघांना  फोंडा पोलिसांनी  शुक्रवारी अटक केली. पोलिसांनी संध्याकाळी उशिरा सदर अर्भकाला   तुये पेडणे येथून ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, एका स्वयंसेवी संस्थेने यासंबंधी तक्रार दिल्यानंतर बालहक्क कायद्यांतर्गत अर्भकाच्या आईसमवेत तिघांना अटक केली.

पैशांच्या हव्यासापायी आईनेच आपल्या पोटच्या 11 महिन्यांच्या अर्भकाची विक्री केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. प्राप्त माहितीनुसार, पुणे (महाराष्ट्र) येथे राहणारी एक महिला आपल्या 11 महिन्यांच्या अर्भकाला सोबत घेऊन काही दिवसांपूर्वी फोंड्यात आली  होती. पती सोबत न आल्याने सदर महिलेने  आपल्या 11 महिन्यांच्या अर्भकाला दोन लाख रुपयांत  विकण्याची तयारी दर्शविली. दि. 23 मार्च रोजी फोंडा येथून सदर महिलेने आपल्या बाळाला पेडणे येथील अमर मोरजी यांना रोख दोन लाख रुपयांच्या मोबदल्यात विकले. या व्यवहारात अनंत दामाजी व योगेश गोसावी यांनी मध्यस्थी केली होती. 

बाळाची विक्री केल्याच्या प्रकरणाची माहिती मिळताच एका स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकार्‍याने फोंडा पोलिसांत गुरुवारी संध्याकाळी संबंधितांविरूध्द रितसर तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी विक्री करणार्‍या मातेसह अन्य तिघाजणांना अटक केली. संध्याकाळी उशिरा 11 महिन्यांच्या बाळाला तुये पेडणे येथून पोलिसांनी ताब्यात घेतले. उपअधीक्षक महेश गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक हरीष मडकईकर याप्रकरणी तपास करीत आहेत.
 

 

tags : Fonda,news,11 month, old, baby, deal,two, lakh ,rupees, Fonda, Three, arrested,