Mon, Aug 19, 2019 09:07होमपेज › Goa › खाणीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु

खाणीसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करु

Published On: May 24 2018 1:22AM | Last Updated: May 23 2018 10:32PMडिचोली : प्रतिनिधी  

राज्यातील  खाणी  तातडीने सुरू कराव्यात यासाठी सरकारचे प्रयत्न  सुरु आहेत. आता केंद्र  सरकारने तातडीने  यात हस्तक्षेप   करावा, यासाठी आपण  प्रत्यक्ष लक्ष  घालून वारंवार  बैठका आयोजित करून  यासाठी पाठपुरावा करणार आहोत, असे आश्‍वासन  साखळीचे आमदार तथा सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी  पाळी येथे आयोजित खाण  अवलंबिताच्या बैठकीत दिले.  गोवा मायनिंग पीपल्स फ्रंटतर्फे तातडीने खाणी सुरु व्हाव्यात, या मागणीसाठी खाण अवलंबितांच्या   संयुक्त  संघटनेतर्फे पाळी  येथे  पंचायत  सभागृहात ही  पहिली बैठक आयोजित करण्यात आली होती.खाण अवलंबितांची ताकद  दाखवून  सरकारला जागे करण्यासाठी ही  संघटना कार्यरत असून या बैठकीस मोठ्या संख्येने खाण अवलंबित   उपस्थित होते. 

डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, खाण बंदीवर तोडगा काढण्यासाठी आपण वरिष्ठ पातळीवर वारंवार बैठका घेणार असून खाण अवलंबितांच्या फ्रन्टच्या नेत्यांनाही आमंत्रित करून पाठपुराव्यासंदर्भात  माहिती देईन . पुती  गावकर यांनी सांगितले, की पोर्तुगीज काळापासून खाण व्यवसाय सुरु आहे. जो कायदा आहे त्यात दुरुस्ती करून आगामी 50 वर्षे व्यवसाय  सुरू  राहील , अशी तरतूद करणारी दुरुस्ती केली तर कोणताच प्रश्‍न उपस्थित होणार नाही व खाणी सुरु करण्याचा मार्गही मोकळा होईल.  राज्य सरकारने केंद्र सरकारवर दबाव आणून व कायद्यात दुरुस्ती करून तसा अध्यादेश काढावा. 

सघंटनेने मागील गोष्टी उकरून न काढता व झालेली चूक सुधारून   गैरमार्गांचा अवलंब न करता   शांततेने लोकांना जागृत करावे. उसगाव येथे 1 जून रोजी आयोजित बैठकीला उपस्थित राहून  सरकारला आमची ताकद दाखवून  देऊ  व खाणी पुन्हा सुरु होण्यासाठी  संघटित होऊ, असेही   गावकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी 1987 च्या कायद्यात दुरुस्ती करून केंद्राने  अध्यादेश काढावा व खाणीचा  मार्ग खुला करावा, अशी मागणी केली 

महेश (शाबा) गावस यांनी सांगितले, की खाणी  तातडीने सुरु करणे गरजेचे असून सर्वांनी आता  मतभेद विसरून एकत्र यावे. कुणावरही टीका न करता  खाणी सुरु करण्यासाठी  सतत सरकारला आमची ताकद दाखवून  देऊ. खाणी  बंद असल्याने मुलांचे शिक्षण व  भवितव्य संकटात  असून खाणग्रस्त भागातील मुलांना लग्नासाठी मुली मिळणे मुश्कील झाले आहे. ही सामाजिक  समस्याच बिकट  असून यावर  तातडीने उपाय निघावा.यावेळी देवानंद परब, कामिलो  फर्नांडिस, सुरेश देसाई, श्याम गावकर रामनाथ परब, यशवंत गावस  यांनीही यावेळी विचार मांडले.