Fri, May 24, 2019 03:01होमपेज › Goa › अकोल्याचे पाच युवक कळंगुट समुद्रात बुडाले

अकोल्याचे पाच युवक कळंगुट समुद्रात बुडाले

Published On: Jun 12 2018 12:52AM | Last Updated: Jun 12 2018 12:46AMम्हापसा  : प्रतिनिधी

गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या  (मोठी उंबरी-अकोला, महाराष्ट्र) येथील 14 जणांच्या गटातील प्रितेश लंकेश्‍वर गवळी (वय 32) या पोलिस कॉन्स्टेबलसह त्याचा भाऊ चेतन  (27) तसेच उज्ज्वल प्रकाश वाकोडे (25), किरण ओमप्रकाश म्हस्के व शुभम गजानन वैद्य हे पाचजण सोमवारी सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास कळंगुट समुद्रात स्नानासाठी उतरले असता बुडाले. बुडालेल्यांपैकी किरण व शुभम  हे दोघे  बेपत्ता असून त्यांचा   शोध सुरू आहे.   

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकोला येथील 14 युवकांचा गट पहाटे 4 वा. ट्रेनने मडगावमध्ये उतरला  व  टॅक्सी करून ते सकाळी 6 वा. कळंगुट समुद्र किनारी आले व खवळलेल्या समुद्राच्या लाटा पाहून  हा गट पाण्यात उतरला. त्यापैकी 5 जण लाटांबरोबर वाहून गेले, तर इतर 9 जण सुखरूप पाण्याबाहेर आले.  काही वेळाने 5 पैकी चेतन, प्रितेश व उज्ज्वल हे वाहून किनार्‍याकडे येताच त्यांच्या इतर मित्रांच्या मदतीने जीवरक्षकांनी त्यांना बाहेर काढले. किरण व शुभम हे दोघे समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाले.

घटनेची माहिती मिळताच 108 रूग्णवाहिकेमधून तिघांनाही कांदोळी आरोग्य केंद्रात दाखल केले असता त्यांना मृत घोषित केले. बंदर कप्तान व किनारी पोलिसांमार्फत कळंगुट पोलिस बेपत्ता युवकांचा शोध घेत आहेत. घटनेचा पंचनामा पोलिस निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली  महेश नाईक करीत आहेत.