Sat, May 25, 2019 22:33होमपेज › Goa › कुडचडे आरोग्य केंद्राच्या पाच कर्मचार्‍यांना मलेरिया 

कुडचडे आरोग्य केंद्राच्या पाच कर्मचार्‍यांना मलेरिया 

Published On: Aug 14 2018 1:04AM | Last Updated: Aug 14 2018 1:04AMमडगाव  : विशाल नाईक

सांगे, केपे, कुडचडे आणि सावर्डे अशा चार मतदारसंघातील रुग्णांची सेवा बजावणार्‍या कुडचडे सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिके बरोबर इस्पितळाच्या रुग्णवाहिकेचे दोन चालक आणि दोन सुरक्षारक्षक मिळून पाच जणांना मलेरियाची लागण झाल्याने कुडचडे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

या पाच जणांबरोबर नवीन इस्पितळाच्या बांधकामावर काम करणारे अनेक कामगार मलेरिया बाधित असून त्यांच्यावर उपचार करून त्याना घरी पाठणविण्यात येत असल्याचे आढळून आले आहे.     या प्रकाराने कुडचडे भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

सविस्तर वृत्ताप्रमाणे गेल्या तीन वर्षांपासून कुडचडे सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. पावसात कंत्राटदाराकडून काँक्रीटचे काम केले जाते. गेल्या वेळी कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे  इस्पितळाच्या बांधकामांत पाणी शिरले होते. यावेळी देखील कंत्राटदराने योग्य खबरदारी न घेतल्याने बांधकामांत चिखल साचून अनेकांना मलेरियाची लागण झाली आहे. आरोग्य केंद्राने खबरदारीचे उपाय म्हणून बांधकामावरील कामगारांना बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी औषधांचे फवारे मारण्याकरिता यंत्र उपलब्ध करून दिले आहे. इस्पितळाचे कर्मचारी मलेरियाचा धसका घेऊन या ठिकाणी काम करत आहेत. सदर इस्पितळ अजून बांधून पूर्ण झालेले नाही. बांधकामाची गती रोडावत चालल्याने अखेर वाहन पार्किंगसाठी उभारण्यात आलेल्या तळमजल्यात हे आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले होते. गेल्या तीन वर्षांपासून इस्पितळ पार्कींगच्या जागेत सुरू आहे पण शेजारीच दुसर्‍या इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने चिखल, साचलेले पाणी आणि इतर अस्वच्छतेच्या प्रकारांमुळे पावसाळ्यातील रोगांची भीती रुग्णांबरोबर इस्पितळातील कर्मचारी वर्गाला भेडसावू लागली आहे.

खुद्द  इस्पितळाचे कर्मकचार्‍यांना मलेरियाची लागण झाल्याविषयी कमालीची गुप्तता पाळण्यात अली होती. विशेष म्हणजे मलेरिया झालेल्या या रुग्णांना इस्पितळात जास्त दिवस भरती करून ठेवण्यात आले नाही. इस्पितळात चौकशी केली असता त्यांच्यावर घरी उपचार सुरू आहेत अशी माहिती प्राप्त झाली.

आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहनराव देसाई यांना विचारले असता पाच कर्मचा़र्‍यांना मलेरियाची लागण झाली आहे असे त्यांनी स्पष्ट केले. मलेरिया बाधित असलेले दोन सुरक्षारक्षक सांगे येथील आहेत. त्यामुळे त्यांना मलेरियाची लागण इथेच झाली आहे, असे म्हणता  येणार नाही तसेच रुग्णवाहिकेच्या दोन चालकांपैकीं एकजण वाळपई येथील तर दुसरा सांगे येथील राहणारा आहे. इस्पितळाची परिचारिका मात्र इथलीच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

इस्पितळाच्या बांधकामावर काम करणारे कामगार वास्को व इतर भागातून आणले जात आहेत. गेल्या आठवड्यात अनेक कामगारांना मलेरियाची लागण झाल्याचे आढळून आले होते. पण आरोग्य केंद्राने योग्य ती काळजी घेतली होती. सध्या मलेरिया नियंत्रणात असल्याचे डॉ. देसाई म्हणाले.