Thu, Apr 25, 2019 07:38होमपेज › Goa › ‘नोबेल प्राईम सिरीज’मध्ये पाच नोबेल विजेत्यांचा सहभाग

‘नोबेल प्राईम सिरीज’मध्ये पाच नोबेल विजेत्यांचा सहभाग

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 28 2018 12:20AMपणजी : प्रतिनिधी

विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान कला अकादमीत देशातील दुसर्‍या ‘नोबेल प्राईज सिरीज’ या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाबरोबरच  1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान नोबेल विज्ञान व भारत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कला अकादमीत 1 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री  मनोहर पर्रीकरांच्या  हस्ते संध्याकाळी 3.30 वाजता नोबेल प्रदर्शनाच्या उदघाटनानंतर ‘नोबल प्राईज सिरीज’चा उदघाटन समारंभ होईल. उद्घाटन कार्यक्रमाला पाच नोबेल पुरस्कार्थींचा सहभाग असेल. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकाराच्या जैव तंत्रज्ञान विभागाचे सचिव पद्मश्री प्रा. विजय राघवन व भारत सरकारच्या अधिकारी देखील कार्यक्रमाला उपस्थित असतील, असे पर्रीकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले, राज्यातील विद्यार्थ्यांच्या स्वभावात  विज्ञान  रुजण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विज्ञानातील विविध क्षेत्रांचा विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा व त्यात करिअर करण्यासाठी उपयुक्त माहिती नोबेल प्राईज सिरिजमधून दिली जाणार आहे. ‘नोबेल प्राईज सिरीज’ कला अकादमी, रविंद्र भवन मडगाव व दोनापावला येथील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओशनोग्राफी या तीन ठिकाणांवर होईल.

कला अकादमीत 2 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात तज्ज्ञांसोबत  विद्यार्थ्यांसाठी तर दुपारच्या सत्रात शिक्षकांसाठी ‘नोबेल डायलॉग’  या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 2 फेब्रुवारी रोजी नोबेल सीरिजमध्ये शालेय व विद्यापीठ स्तरावरील विद्यार्थी, तंत्रज्ञान संस्थेतील अधिकारी तसेच तज्ज्ञ सहभागी होणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. रविंद्र भवन मडगाव येथे 3 फेब्रुवारी रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थी तसेच शिक्षकांसाठी ‘नोबेल डायलॉग’  होणार आहे.