Tue, Apr 23, 2019 09:36होमपेज › Goa › मासळी आयातबंदीची मुदत वाढवू नये : भंडारे  

मासळी आयातबंदीची मुदत वाढवू नये : भंडारे  

Published On: Aug 01 2018 1:22AM | Last Updated: Aug 01 2018 12:09AMपणजी : प्रतिनिधी

गोव्यात परराज्यातून मासळीच्या आयातीवरील बंदीमुळे गोव्यातून अन्य राज्ये व विदेशात केल्या जाणार्‍या मासळीच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे. यामुळे मासळी आयात बंदीचा कालावधी वाढवू नये, अशी  मागणी गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संदीप भंडारे यांनी पत्रकार परिषदेत केली.

भंडारे म्हणाले, राज्य सरकारच्या आदेशानुसार गोव्याबाहेरील मासळीवर 3 ऑगस्टपर्यंत बंदी घातली आहे. राज्यातील लोकांना सुरक्षित व चांगली मासळी खायला मिळाली पाहिजे हे बरोबर आहे,  मात्र त्यासाठी मासळीवर पूर्णत: बंदी हा उपाय होऊ शकत नाही. मासळीच्या दर्जाची तपासणी करून मासळीची आयात करण्यासारख्या अन्य उपाययोजना आखल्या पाहिजेत. सध्याच्या मासळी आयातबंदीचा परिणाम केवळ मासळी विक्रेत्यांच्या व्यवसायावरच झाला नसून गोव्यातून कित्येक वर्षे सुरू असलेल्या मासळीच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे.

राज्यातून मासळी निर्यात करण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करावी लागते. गोव्यात अशी 12 प्रक्रिया केंद्रे आहेत. या केंद्रांतून वर्षाला एकूण 45 ते 50 हजार टन मासळी निर्यात केली  जाते.  राज्यातून  चीन, अमेरिका  यांसारख्या अनेक देशांत मासळीची निर्यात होतेे. ही निर्यात केलेली मासळी केरळ, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक  या राज्यांतून आणली जाते. या मासळी निर्यातीतून सुमारे 700 कोटी रुपयांच्या विदेशी चलनाची कमाई होते. गोव्याबाहेरील मासळीवर बंदी घातल्यामुळे निर्यातदारांना पुरेशी मासळी उपलब्ध होत नाही, असेही ते म्हणाले.

फार्मेलिनच्या वापराबाबत  कडक नियम लागू करून नियंत्रण ठेवणे शक्य आहे. मासळी निर्यात किंवा आयात करण्याचा व्यवहार अत्यंत प्रामाणिक असणे आवश्यक असते.  एखादी छोटी चूकही आतापर्यंतच्या लौकिकाला मातीमोल करण्यास कारणीभूत ठरू शकते, असेही त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत जोसेफ डिसोझा, डोमिना डिसोझा, नवजीत पुजारी व  आर. एस. तारी उपस्थित होते.