Sat, Mar 23, 2019 16:06होमपेज › Goa › राज्यात आजपासून मासेमारी बंदी 

राज्यात आजपासून मासेमारी बंदी 

Published On: Jun 01 2018 1:58AM | Last Updated: Jun 01 2018 12:25AMपणजी : प्रतिनिधी

राज्यात  शुक्रवार दि. 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत 61 दिवसांची मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे  राज्यातील विविध  मच्छीमारी ट्रॉलर्सवरील  परप्रांतीय कामगार  सध्या आपापल्या  गावी   परतण्याच्या तयारीत आहेत. गोव्यात मालीम, कुटबण, आदी विविध जेटींवर सुमारे 1 हजारहून अधिक मच्छीमारी ट्रॉलर्स आहेत. सर्व ट्रॉलर्सनी गुरुवारी  मध्यरात्री  मासेमारी थांबवली. मच्छीमारी ट्रॉलर्स बरोबरच मासेमारी करणार्‍या यांत्रिक बोटींनादेखील मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे.

राज्यात पावसाळा सुरू होताच  मासेमारी बंदी लागू करण्यात येते. पावसाळ्यात माशांचा प्रजननकाळ  असल्याने दरवर्षी  जून ते  जुलै असे दोन महिने मासेमारी बंदी लागू करण्यात येते.  मासेमारी बंदी काळात मासेमारी  होऊ नये, यासाठी  प्रशासनाकडून कडक उपाययोजना  हाती घेतल्या जातात.मालीम जेटी येथे सुमारे 360 मच्छीमारी ट्रॉलर्स असून यावर  ओडिशा, केरळ,कर्नाटक, छत्तीसगड  येथील कामगार मोठ्या संख्येने काम करतात. मासेमारी बंदी लागू होताच या कामगारांना काम नसते. त्यामुळे   हे सर्व कामगार  ट्रॉलर्स नांगरुन तसेच आवश्यक तो हिशोब करून आपापल्या गावाला जातात. त्यानंतर मासेमारी बंदी संपुष्टात यायला काही दिवस शिल्‍लक असताना हे कामगार पुन्हा कामावर येतात.  राज्यातील मच्छीमार ट्रॉलर्सवरील 98 टक्के कामगार परप्रांतीय आहेत.