Mon, Jun 24, 2019 21:25होमपेज › Goa › ...तर नाक्या-नाक्यांवर मासळी विक्री करू 

...तर नाक्या-नाक्यांवर मासळी विक्री करू 

Published On: Mar 02 2018 12:48AM | Last Updated: Mar 02 2018 12:07AMदाबोळी : प्रतिनिधी

मासळी मार्केटमधील मासळी विके्रत्या महिला आणि घाऊक मासळी विक्रेते यांच्या वकिलांचा युक्‍तिवाद ऐकल्यानंतर मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांनी पुन्हा एकदा 5 मार्चपर्यंत निर्णय स्थगित ठेवल्याने मासळी विक्रेत्या महिलांनी संतप्त होऊन बुधवारी पालिका कार्यालयात गोंधळ घातला. येत्या 5 मार्चला कोणताही निर्णय न झाल्यास दि. 6 पासून शहरातील नाक्या-नाक्यांवर मासळी विक्रीसाठी बसू, असा इशारा दिला.

टी. बी. कुन्हा चौकातील घाऊक मासळी विक्रीसंबंधी 5 मार्च रोजी निर्णय घ्या, अन्यथा 6 मार्चपासून टी.बी. कुन्हा चौक, मुरगाव पालिका इमारतीसमोर, कदंब बसस्थानकाजवळ तसेच अन्यत्र मासळी विक्री करू, असा इशारा मासळी मार्केटातील विक्रेत्यांनी  दिला.

मार्केटमधील मासळी विक्रेत्यांची बाजू फादर मायकल यांनी तर घाऊक मासळी विक्रेत्यांची बाजू अ‍ॅड.दिलेश्‍वर नाईक यांनी मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस यांच्यासमोर  बुधवारी मांडली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर मासळी विक्रेत्यांच्या समस्येवर येत्या 5 मार्चला निकाल देऊ, असे फर्नांडिस यांनी सांगितले.  

गेल्या 15 वर्षांपासून मासळी विक्री करत आहोत, आमच्याकडे पालिकेने दिलेला सी फूड विक्रीसंबंधीचा परवाना आहे, आम्ही नियमांचे कोणतेही उल्लंघन केलेले नसून घटनेने दिलेल्या अधिकारानुसार आम्हाला व्यवसाय करण्याचा हक्क आहे, मात्र काहीजण दबाव आणून आमचा व्यवसाय बंद पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा घाऊक मासळी विक्रेत्यांतर्फे अ‍ॅड. नाईक यांनी केला.

घाऊक मासळी विक्रेत्यांकडे आरोग्य, अग्निशमन दल तसेच इतर आवश्यक परवाने नाहीत. शिवाय अलिकडे त्यांनी व्यवसाय सुरू केला आहे. व्यवसाय सुरू केल्याच्या  दिवसापासून आम्ही विरोध करत आहोत. पालिकेने नेमून दिलेल्या जागेव्यतिरिक्‍त अन्यत्र मासळी विक्री करता येत नाही, परंतु घाऊक विक्रेते या नियमाचे उल्लंघन करत आहेत, असा युक्‍तीवाद किरकोळ मासळी विके्रत्या महिलांच्या वतीने फादर मायकल यांनी केला.