Tue, Mar 19, 2019 05:08होमपेज › Goa › ‘कांपाल’वर फटाके दुकाने; निर्देशांवरून दुकानदारांत गोंधळ 

‘कांपाल’वर फटाके दुकाने; निर्देशांवरून दुकानदारांत गोंधळ 

Published On: Sep 07 2018 1:04AM | Last Updated: Sep 07 2018 1:04AMपणजी : प्रतिनिधी

गणेश चतुर्थीनिमित फटाके  विक्रेत्यांनी यंदा पणजी मार्केटात फटाके विकण्याऐवजी  कांपाल येथील ‘साग’ मैदानावर फटाक्यांची दुकाने थाटण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिल्याच्या  वृत्तावरून दुकानदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, अशा प्रकारचे निर्देश दिले नसल्याचे उत्तर गोवा जिल्हाधिकारी  लेव्हिसन मार्टीन्स यांनी स्पष्ट केले. मात्र,  फटाके विकण्यासाठी अग्निशमन दलाकडून  ‘ना हरकत दाखला’  घेण्यास या दुकानदारांना सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

गणेश चतुर्थीकाळात दरवर्षी पणजी बाजारात फटाक्यांची विक्री केली जाते. काही ठराविक दुकानदारच  ही फटाक्यांची विक्री करतात. मात्र  यावेळी  अग्निशमन दलाकडून  ‘ना हरकत दाखला’ घेतल्यानंतर या दुकानदारांना पणजी मार्केटऐवजी   कांपाल येथील ‘साग’ मैदानावर  जागा निश्‍चित करून द्यावी, असे निर्देश उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांनी अग्निशमन दलाला दिल्याचे वृत्त दुकानदारांमध्ये पसरले. त्यामुळे दुकानदारांमध्ये एकच गोंधळ माजला. याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी घेऊन सुमारे 10 फटाके विक्रेत्या दुकानदारांनी महापौर  विठ्ठल चोपडेकर यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन गुरुवारी भेट घेतली. दुकानदारांनी या भेटीत कांपाल येथे फटाके 

विक्री करण्यास विरोध असल्याचे महापौर चोपडेकर यांना सांगितले. सदर निर्णय केवळ पणजीतील दुकानदारांनाच का लागू करण्यात आला, असा सवालही यावेळी दुकानदारांनी उपस्थित केला. महापौरांची भेट घेतल्यानंतर या दुकानदारांनी उत्तर गोवा जिल्हाधिकारी   मार्टीन्स यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली.  मार्टीन्स यांनी यावेळी   फटाके विक्रीसाठी अग्नीशमन दलाचा ‘ना हरकत दाखला’ आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.